दीड वर्षानंतर उघडणार पददा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

येरवडा - येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे उद्‌घाटन दीड वर्षापूर्वी झाले होते; मात्र उद्‌घाटनानंतर बंदच असलेल्या या नाट्यगृहाच्या रंगमंचाचा पडदा आता लवकरच उघडणार आहे. या नाट्यगृहाचा ताबा नुकताच महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. त्यामुळे परिसरातील रसिक प्रेक्षकांना कला, संगीत आणि नाटकांची पर्वणी मिळणार आहे. 

शहराच्या पूर्व भागात पुणे महापालिकेने दहा कोटी रुपये खर्च करून पहिलेच अण्णा भाऊ साठे नाट्यगृह उभारले आहे. अथेन्स येथील स्थापत्य शास्त्राचा आधार घेऊन साडेतीन हजार चौरस मीटर जागेत नाट्यगृहाची उभारणी केली आहे. नाट्यगृहात सुमारे साडेसहाशे आसनक्षमता आहे. दीड वर्षांपूर्वी नाट्यगृहाचे काम अर्धवट असतानाच महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते २५ डिसेंबरला याचे उद्‌घाटन करण्यात आले होते. मात्र दीड वर्षानंतरही नाट्यगृहाच्या रंगमंचाचा पडदा अद्याप उघडला गेला नव्हता. त्यामुळे रसिक प्रेक्षकांसह नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. नाट्यगृहाचे काम अधर्वट असताना उद्‌घाटन का केले, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत होते. 

अथेन्स स्थापत्य शास्त्रकलेचा लुक
ग्रीक देशातील अथेन्समधील स्थापत्यशास्त्राचा आधार घेऊन नाट्यगृहाची आकर्षक बाह्यरचना केली आहे. विशिष्ट स्वरूपाच्या काचा, अत्याधुनिक पद्धतीचे रंगमंच, ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यात आली आहे. नाट्यगृहाच्या आवारात अण्णा भाऊ साठे यांचा आठ फुटी पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूस अण्णा भाऊ साठे यांच्या रशियाच्या दौऱ्यातील घटनाक्रम म्युरल्सच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. मात्र अद्याप त्या तयार करण्यात आल्या नाहीत. आठ ते दहा दिवसांत नाट्यगृह सुरू होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Lokshahir Annabhau Sathe theater