एकेरी वाहतुकीचा बोरघाटात पर्याय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

बोरघाटात दरडी आणि लोहमार्गाखाली भराव खचल्याने आठवडाभर पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प आहे. रेल्वेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. घाटाची भौगोलिक रचना आणि मुसळधार पाऊस यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत.

लोणावळा  : गेल्या महिनाभरापासून बोरघाटात दरडी कोसळत असल्याने पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे. लोहमार्ग दुरुस्तीच्या कामात मुसळधार पावसामुळे पुन्हा दरडी कोसळत असल्याने अडथळे येत आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी लोणावळा ते कर्जत दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात एकेरी मार्गावरून दोन्ही बाजूची (अप आणि डाऊन) वाहतूक सुरू करण्याचा विचार रेल्वे सूत्रांकडून सुरू आहे. 

बोरघाटात दरडी आणि लोहमार्गाखाली भराव खचल्याने आठवडाभर पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प आहे. रेल्वेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. घाटाची भौगोलिक रचना आणि मुसळधार पाऊस यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. मुंबईकडे जाणारी सेवा अंशतः सुरू करण्यात आली असून, लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या. मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक आठवडाभरानंतर सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुण्याकडे येणारी वाहतूक अद्याप ठप्पच आहे. वाहतूक बंद असल्याने रेल्वेपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. पुण्याकडे येणारी वाहतूक बंद असल्याने नोकरदार, चाकरमानी, व्यावसायिक, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही कोंडी सोडविण्यासाठी बोरघाटात लोणावळा ते कर्जत दरम्यान एका मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्याबाबत रेल्वे प्रसासन गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामुळे किमान ही सेवा पूर्णपणे ठप्प होणार नाही. 

डोंगराच्या कडेने संरक्षक भिंत 
रेल्वेच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, भराव खचल्याच्या ठिकाणी खोल दरी असल्याने तेथे संरक्षक भिंत उभारण्याचे काम रेल्वेच्या वतीने सुरू आहे. मिडल लाइन सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहे. मात्र, घाटात सुरू असलेला पाऊस आणि सुट्या झालेल्या दरडी खाली येत असल्याने कामात अडथळे येत आहेत. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय कुमार जैन यांनी बोरघाटात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonavala borghat one way