‘द्रुतगती’वर एकच लेन सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळाने धोकादायक दरडी काढण्याचा (लूज स्केलिंग) कामासह दरडींवर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहतूक पंधरा मिनिटांच्या अंतराने बंद ठेवण्यात येणार आहे.  

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळाने धोकादायक दरडी काढण्याचा (लूज स्केलिंग) कामासह दरडींवर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहतूक पंधरा मिनिटांच्या अंतराने बंद ठेवण्यात येणार आहे.  

हे काम ६ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान टप्प्याटप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. भातण बोगदा व अमृतांजन पुलाजवळ दरडींवर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हे काम सुरू असताना वाहतूक विस्कळित झाली नाही. रस्ते विकास महामंडळाने भातण बोगदा, आडोशी बोगदा, खंडाळा बोगदा तसेच अमृतांजन पुलाजवळ धोकादायक दरडी पाडण्याच्या कामाबरोबर दरडींवर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे.

मार्गावरील वाहतूक पंधरा मिनिटांच्या अंतराने बंद ठेवण्यात येणार आहे.  
मार्गावर तीन वर्षांपूर्वी दरडी पडल्याने अपघात झाले होते. या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी मेकाफेरी कंपनी, परदेशी तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून बोरघाटातील धोकादायक दरडींवर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकले आहे. बोरघाटात दरडींचा धोका कायम असल्याने सुमारे साठ कोटी रुपये खर्चून दरडी काढण्याचा कामाबरोबर जाळ्यांचे आच्छादन टाकण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये आडोशी बोगदा व किलोमीटर क्र.३९ जवळ धोकादायक व सैल झालेल्या दरडी पाडण्याचे काम हाती घेतले आहे. 

दक्षतेने प्रवासाच्या सूचना
मार्गावर दररोज ९० हजार वाहने प्रवास करतात. द्रुतगतीसह जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, मार्गावरील मुंबई ते पुणे बाजूकडील तीन लेनपैकी एक लेन व राष्ट्रीय महामार्गावरील अमृतांजन पुलावरील तसेच खंडाळा बोगद्यापुढे एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवली आहे. पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक विस्कळित होण्याची शक्‍यता असल्याने प्रवाशांनी दक्षता घेत सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: lonavala news pune news express way one way