‘बिनविरोध’चा सुवर्णमहोत्सव

‘बिनविरोध’चा सुवर्णमहोत्सव

लोणावळा - लोणावळ्यापासून सुमारे सोळा-सतरा किलोमीटरवर अतिशय दुर्गम ठिकाणी राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या उढेवाडी ग्रामपंचायतीने पन्नास वर्षानंतरही आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखून इतर गावांना आदर्श घालून दिला आहे. 

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के वसुली करणारी उढेवाडी ग्रामपंचायत ही ऐकमेव आहे. गावाने विकासाच्या वाटेवर वाटचाल सुरू ठेवली आहे. या गावात कधीकाळी गाडी पोचत नव्हती, तेव्हापासून ग्रामपंचायतीने गावपातळीवर निर्णय घेत गावच्या विकासासाठी एकत्र येत गावाचा विचार सुरू केला. उढेवाडी (राजमाची) हे ७८ घरांचे गाव आहे. लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास. १९६७ मध्ये येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाली. पहिल्या निवडणुकीपासून ग्रामपंचायत बिनविरोध होत आली. बहुतांश आदिवासी वस्ती. प्रामुख्याने आदिवासी महादेव कोळी, पाणभरे कोळ्यांची संख्या येथे जास्त आहे. मात्र, जातीच्या दाखल्यांअभावी येथील ग्रामस्थ सरकारच्या योजनांपासून वंचित राहत होते. निवडणुकांमध्ये आरक्षण जाहीर होते. मात्र जातीचे दाखले नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणी होत्या. या अडचणींमुळे निवडणुकीतही सहभागी होता येत नव्हते. यामुळे २००३ ते २०१३ या दहा वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. मात्र, या काळातही ग्रामस्थांनी सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत दुर्गम ठिकाणी विविध विकासकामांना चालना दिली आहे. गावातील बहुतांश नागरिक हे गरीब व आदिवासी असतानाही ते कसलेही आढेवेडे न घेता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एक एप्रिलला शंभर टक्के कर भरणा करीत नावलौकीक मिळवला आहे. 

ग्रामस्थांच्या एकीमुळे केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना जाहीर होताच पहिल्याच वर्षात निर्मल होण्याचा बहुमान उढेवाडीने मिळविला. सरकारचा पर्यावरण विकासरत्न पुरस्कार मिळविणारी उढेवाडी मावळातील एकमेव. तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात २००५-०६ मध्ये तालुक्‍यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. यशवंत पंचायत राज अभियानात तालुक्‍यात द्वितीय क्रमांक ग्रामपंचायतीने मिळवित शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. एकेकाळी रस्ता, वीज आणि पाण्याअभावी वंचित असलेले हे खेडे आज स्वयंपूर्ण होत असताना लोकसहभागातून राजकीय गदारोळात निवडणूक बिनविरोध करीत इतर गावांपुढे उढेवाडीने आदर्श घालून दिला आहे.

सरपंचपदी प्रगती वरे बिनविरोध
मावळातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा संकल्प केला. अनुसूचित जमाती महिलेसाठी सरपंचपद आरक्षित होते. सरपंचपदासाठी प्रगती विलास वरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत सरपंचपदाची माळ प्रगती वरे यांच्या गळ्यात पडली. सदस्यपदी स्वाती संतोष येवले, दीपिका प्रताप उंबरे, रंजना सुरेश जाणिरे, समीर एकनाथ उंबरे, नीलेश खंडू वरे, किरण दशरथ वरे यांची बिनविरोध निवड झाली.

एकजुटीतून बिनविरोध
उढेवाडी ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. ती कायम राखण्यासाठी गावात दोन बैठका झाल्या. गावामध्ये एकविचाराने कामे मार्गी लागतात आणि वादविवादाने विकासात अडथळा येतो, असा विचार बैठकीत झाला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात  आला. सरपंचपदासाठी प्रगती वरे यांच्यासह दीपिका उंबरे यांनी वॉर्ड क्रमांक दोन मधून अर्ज दाखल केलेला होता. तर सर्वसाधारण जागेसाठी स्वाती येवले यांच्यासह शिल्पा ढाकोळ यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. त्यात बिनविरोध या निर्णयावर शिक्कामोर्तब करून सरपंचपदासह सदस्यांची निवडही एकमताने करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com