बोचऱ्या थंडीत ‘वीकेंड’ची मज्जा

बोचऱ्या थंडीत ‘वीकेंड’ची मज्जा

लोणावळा - लोणावळा- खंडाळा म्हटलं की थंड हवेचं ठिकाण, जगप्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद, पावसाळी पर्यटनाचं केंद्र, रेल्वेने असो वा वाहनाने घाट चढताना आणि उतरताना दिसणारं सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य यामुळे पर्यटकांचा ओढा लोणावळा-खंडाळ्याकडे अधिक आहे. पुण्या-मुंबईसह लगतच्या परिसरातील पर्यटक बोचऱ्या थंडीतही ‘विकेंड एन्जॉय’ करण्यासाठी हमखास या भागाची निवड करतात. आता थंडी फारशी नसली, तरी वातावरणातील सुखद गारव्याची भुरळ अनेकांना पडू लागली आहे. मनमोहक वातावरणाला निसर्गाची साद लाभत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढत असून पुढील महिन्यात विकेंड होम्स, रिसॉर्टस आतापासून ‘बुक’ होऊ लागली आहेत.

भटकंतीची ठिकाणे
कार्ला लेणी, भाजे लेणी, एकवीरा देवी मंदिर, पवना धरण, पवन मावळ, खंडाळा, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोराईगड ही भटकंतीसाठी पसंतीची ठिकाणे आहेत. यापैकी एखादे ‘डेस्टिनेशन’ निवडत हौशी ट्रेकर्स व भटकंती करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्या पाठोपाठ पर्यटकांचा नंबर लागतो. पावसाळ्यात भुशी धरण आकर्षण ठरते. सध्या शनिवार व रविवार काही प्रमाणात पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळते. 

पावसाळी पर्यटनाचे केंद्र
ब्रिटिशकाळात थंड हवेचे ठिकाण असा खंडाळा, लोणावळ्याचा लौकिक होता. आता पावसाळी पर्यटन केंद्र म्हणून ते नावारूपास येत आहे. केवळ पावसाळ्यात पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात असते. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य, उंच कड्यावर कोसळणारे धबधबे, दऱ्या-खोऱ्यातून वाहणारे झरे, ओढे असे सुंदर वातावरण पाहण्यासाठी देशभरातून गर्दी होत असते. लायन्स पॉइंट, सनसेट पॉइंट महत्त्वाची ठिकाणे आहेत. 

कायमस्वरूपी पर्यटन केंद्र व्हावे
पर्यटकांची ओढ कायम राहावी, यासाठी महाबळेश्‍वर, माथेरान यांसारखे विविध पॉइंट निर्माण करण्याची गरज आहे. लोणावळा, खंडाळा ही सर्वकालीन पर्यटनाचे केंद्र बनावे, यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे. पर्यटकांना सोयीसुविधा मिळाव्यात, त्रास कमी व्हावा, वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

दिवाळीनंतर हंगाम ओसरतो - जोशी
दिवाळी सुटीनंतर लोणावळा- खंडाळ्यातील पर्यटकांचा हंगाम ओसरतो. मात्र डिसेंबरमध्ये वीकेंड होम्स व हॉटेल्समधील बुकिंग जवळपास फुल्ल असते, असे हॉटेल व्यावसायिक अतुल जोशी यांनी सांगितले. ‘थर्टीफर्स्ट’साठी लोणावळ्यात मोठी गर्दी होत असल्याने जय्यत तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुविधांसाठी प्रयत्नशील - जाधव
लोणावळा-खंडाळ्यातील अर्थकारण प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहेत. लोणावळ्यात पर्यटक यावेत, त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहोत, असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले. पर्यटकांसाठी विविध स्पॉट विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com