लोणावळा नगरपरिषदेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा   

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

लोणावळा : ''लोणावळा शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे वाढ होत असून नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे,''असे आवाहन लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.​

लोणावळा : ''लोणावळा शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे वाढ होत असून नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे,''असे आवाहन लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.
लोणावळा नगरपालिकेच्या  प्रशासकीय इमारतीत कार्यालयांमध्ये पूरनियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.

टाटांच्या लोणावळा धरणाचा पाणीसाठा ६.०५ दशलक्ष घनमीटर झाला असून जलाशय पातळी सांडव्याच्या मध्यापासून १.८९ मीटर ने कमी आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास इंद्रायणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा हायड्रो पॉवर च्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना इशारा दिला आहे. नांगर गाव येथे इंद्रायणी नदीकाठच्या अनेक सोसायट्यांना पावसाच्या पाण्याने वेढा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे  इंद्रायणी नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. येत्या काळात आणखी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नदीच्या पात्राजवळ व पुलाच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न नागरिकांनी करून जीव धोक्यात घालू नये असे आवाहन नगराध्यक्ष  सुरेखा जाधव  व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonavla Municipal Council alerts citizens