लंडनचे तरुण राजगडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

भारत देश अतिशय निसर्गसंपन्न असून, येथील निसर्ग आणि वन्यजीव टिकविण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्रातील वेल्हे तालुक्‍यातील शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला आम्हाला खूप आवडला. या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळात नोंद असल्याने आम्ही तो आवर्जून पाहिला.
- बेल फ्यारी, रिक्षा दौड पर्यटक, लंडन

वेल्हे - पर्यावरण रक्षणासह विश्‍वबंधुत्व व ऐक्‍य यांचा संदेश देण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनची राजधानी लंडन येथील सहा ध्येयवेड्या तरुणांनी कोची ते जैसलमेर यादरम्यान ‘रिक्षा दौड’ मोहीम हाती घेतली आहे. 

जेत्रो क्रोक, बेल फ्यारी, सयाम स्नोड, रुफ्फ रेज्जास, जेस्स फ्योबेर्स, लेम पुलं हे सहा ध्येयवेडे तरुण १८ दिवस ५ राज्याच्या सीमा पार करत येथील शहरी व ग्रामीण भाग आणि जंगल प्रदेशातून प्रवास करत वनसंरक्षण व शांतीचा संदेश देत आहेत. 

केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या पाच राज्यांमधून ते विविध संस्कृतीचा अभ्यास व चित्रीकरण करत आहेत. वेल्हे तालुक्‍यातील स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगड किल्ल्याला त्यांनी नुकतीच भेट दिली. लंडन येथील हे सहाही तरुण उच्चशिक्षित आहेत. विश्वशांतीचा व बंधुत्वाची संदेश या रिक्षा दौडमधून ते देत आहेत.

हा लांब पल्ल्याचा प्रवास दोन रिक्षांमधून ते करत असून, रिक्षांच्या वर दुर्मिळ जग्वार प्राण्याची बसवलेली प्रतिकृती सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. भारतीय ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अंधार पडेल. त्या खेडेगावात मुक्काम करणे, गावामधील ग्रामीण पद्धतीचे मिळेल ते जेवण करणे, नदीवर आंघोळ करणे असा नैसर्गिक प्रवास ते करत आहेत. 

Web Title: london youth on rajgad environment security