सर्वांत लांब पल्ल्याची तोफ पुण्यात विकसित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - सर्वांत लांब पल्ल्याचे लक्ष्य उद्‌ध्वस्त करण्याची क्षमता असलेली जगातील एकमेव तोफ (ऍटॅग्स) लष्करात येणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान पुण्यातील पाषाण येथील अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (एआरडीई) म्हणजे आयुध संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे. येत्या दोन वर्षांत ही तोफ वापरासाठी उपलब्ध होईल. 

पुणे - सर्वांत लांब पल्ल्याचे लक्ष्य उद्‌ध्वस्त करण्याची क्षमता असलेली जगातील एकमेव तोफ (ऍटॅग्स) लष्करात येणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान पुण्यातील पाषाण येथील अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (एआरडीई) म्हणजे आयुध संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे. येत्या दोन वर्षांत ही तोफ वापरासाठी उपलब्ध होईल. 

"एआरडीई'चे हे हीरक महोत्सवी वर्ष असून, संस्थेच्या स्थापनेस एक सप्टेंबर रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेने गेल्या 60 वर्षांत तिन्ही सैन्य दलांसाठी शस्त्रांचे तंत्रज्ञान निर्मिती करून, संरक्षण सिद्धतेत मोठे योगदान दिले आहे. छोट्या रिव्हॉल्व्हरपासून ते रॉकेट लॉंचरपर्यंत शस्त्रास्त्रे या संस्थेने विकसित केली आहेत. आकाश, पृथ्वी, नाग यांसारख्या क्षेपणास्त्र आणि त्यांचे बॉंब तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर ते संरक्षण दल आणि खासगी क्षेत्राला हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. 

रणगाडाविरोधी "अदृश्‍य' भू-सुरुंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. मेटल डिटेक्‍टरलाही हुलकावणी देणारे तंत्रज्ञान यात आहे. रणगाड्यावरून विशिष्ट दिशेला डागता येणारी क्षेपणास्त्रे तसेच पिनाका रॉकेट लॉंचर सिस्टीमही एआरडीईने तयार केली आहे. या यंत्रणेचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरासाठीदेखील हस्तांतरित करण्यात आले आहे, असे संस्थेचे संचालक डॉ. के. एम. राजन यांनी सांगितले. संस्थेने विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांची प्रारूपासह माहितीदेखील त्यांनी या वेळी दिली. 

48 किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता 
सर्वांत लांब पल्ल्याच्या तोफेची माहिती देताना संस्थेतील शास्त्रज्ञ आणि प्रकल्प संचालक काशीनाथ देवधर म्हणाले, ""मोठी मैदानी तोफ (155 एमएम*52 एमएम कॅलिबर) ही विकसित करण्यात आली आहे. लक्ष्यावर मारा करण्यासाठी सर्वांत लांब पल्ला आपण साध्य केला आहे. या तोफेच्या मर्यादित चाचण्या घेतल्या आहेत. त्यात 48 किलोमीटर एवढ्या अंतरावर लक्ष्य भेदण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. जगात एवढ्या लांब पल्ल्याची तोफ कोठेच नाही, ती आपण विकसित केली असून, पोखरण येथे सहा चाचण्या घेतल्या आहेत. ही तोफ लष्करात दाखल होण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागेल.''

Web Title: The longest guns are developed in Pune