लोणी धामणीत दुष्काळाच्या झळा

Empty-Well
Empty-Well

पारगाव - आंबेगाव तालुक्‍यातील लोणी-धामणी परिसरातील सात गावांमध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसाळा संपला असून या भागातील ओढेनाले व पाझर तलाव कोरडे पडले आहेत. विहिरींची पातळीही घटल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर बनला आहे.

आंबेगाव तालुक्‍यातील शिरदाळे, पहाडदरा, धामणी, लोणी, वडगावपीर, मांदळवाडी व खडकवाडी हा परिसर कमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळजन्य स्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार, भीमाशंकर साखर कारखाना, हरिता कंपनी व ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या माध्यमातून या भागात जलसंधारणाची कामे झाली. पावसाचे पाणी जिरविण्यात यशही आले. गेली दोन वर्षे बंधारे; तसेच विहिरींनाही चांगले पाणी होते; 

परंतु यंदा निसर्गाची पुन्हा अवकृपा झाली आहे. सुरवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पाझर तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. विहिरी आटू लागल्या आहेत. 

पावसाअभावी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा या पिकांच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. काही वाड्या वस्त्यांवर आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महिन्यानंतर पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे टॅंकर सुरू करावा लागणार आहे. दुष्काळाच्या छायेमुळे सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट पसरले आहे.

आंबेगाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत तांत्रिक अडचणी येतात; परंतु यंदाची टंचाई स्थिती पाहता सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा. पावसाअभावी या भागात रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. पाणीटंचाईमुळे काही कुटुंबे नदीकाठावर असलेल्या गावांकडे स्थलांतर करण्याच्या मनःस्थितीत आहेत. सरकारने तातडीने विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. 
- रवींद्र करंजखेले, पंचायत समिती सदस्य

पाऊसच झाला नसल्यामुळे लोणी धामणी परिसरातील आठ गावांमध्ये रब्बी हंगामातील पेरण्या झालेल्या नाहीत. चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी, दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. टंचाईमुळे शेतकरी जनावरे विकू लागले आहेत. त्यामुळे सरकारने पाण्याच्या टॅंकरबरोबरच जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची गरज आहे. 
- ऊर्मिला धुमाळ, सरपंच, लोणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com