‘पे अँड पार्क’च्या नावाखाली लूट

‘पे अँड पार्क’च्या नावाखाली लूट

मार्केट यार्ड - बाजार समितीमध्ये गेल्या महिन्याभरापासून गेट क्र. ३ जवळ एका खासगी कंपनीकडून अवैधरीत्या पार्किंगची वसुली सुरू आहे. संबंधित कंपनीला तसे कोणतेही आदेश नसतानाही ‘पे अँड पार्क’च्या नावाखाली वाहनधारकांची लूट केली जात आहे.  

बाजार समिती आवारात नागरिक, व्यापाऱ्यांची वर्दळ असल्याने वाहनांची संख्या मोठी असते, त्यामुळे परिसरात पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. सध्या गेट क्र. १ वर पे अँड पार्कची सुविधा असून, खासगी कंपनीला वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. गेट क्र. ४ वरील पार्किंगची वसुली बाजार समितीकडून केली जाते; मात्र गेट क्र. ३ वर कोणतीही पार्किंग सुविधा नव्हती. तेथे फळांचा आणि कांदा- बटाट्यांचा बाजार भरत असल्याने मोठ्या संख्येने ग्राहक येत असतात, त्यामुळे बेशिस्त पार्किंग वाढले होते. 

समितीच्या सुरक्षा विभागाकडून सातत्याने दुचाकींवर कारवाई केली जात होती. पार्किंगची मागणी लक्षात घेता समितीने लाखो रुपये खर्च करून गेट क्र. ३ जवळ, प्रवीण मसालेच्या समोरच्या भागात दुचाकी पार्किंगची व्यवस्था केली. ही सुविधा सध्या तरी मोफत आहे; परंतु गेल्या महिन्याभरापासून खासगी कंपनीकडून ‘पे अँड पार्क’च्या नावाखाली अवैधरीत्या वसुली केली जात आहे. पार्किंग सकाळी सात ते दुपारी २ पर्यंत असते. त्यासाठी १० रुपये आकारले जातात, तशी पावतीही दिली जाते. जो पावती मागेल त्याला ती दिली जाते; एखाद्याने न मागितल्यास मात्र दिली जात नाही. या गेटवर पार्किंगची वसुली करण्याचा कोणताही आदेश बाजार समितीकडून संबंधित कंपनीला देण्यात आलेला नसतानाही अशाप्रकारे वसुली करून लूट केली जात आहे. दिवसाढवळ्या होणारी ही लूट बाजार समितीच्या लक्षात येत नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

संबंधित कंपनी दुसऱ्या पार्किंगच्या नावाखाली वसुली करत असेल, तर मी माहिती घेऊन तत्काळ कारवाई करतो. तसे काही आढळल्यास वसुली बंद  केली जाईल.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती
 

दुचाकी वाहने गेटबाहेर लावली जात होती. त्यासाठी त्यांना तेथे पार्किंगची व्यवस्था केली आहे. तेथे अशाप्रकारे वसुली केली जात असेल तर ती बंद करू. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करतो. आजपर्यंत झालेल्या वसुलीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ.
- सोमनाथ बोरकर,  सुरक्षा विभाग, बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com