शस्त्राचा धाक दाखवून पावणेतीन लाखांची रोकड लुटली

गणेश बोरुडे
गुरुवार, 3 मे 2018

दिवसाढवळ्या शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत २ लाख ९० हजार रुपयांची मनी ट्रान्स्फरची जमा रक्कम लुटल्याची घटना बुधवारी (ता.०२) सकाळी सव्वादहाच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबी-वराळे रस्त्यावरील इंद्रायणी पुलावर घडली.

तळेगाव स्टेशन : दिवसाढवळ्या शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत २ लाख ९० हजार रुपयांची मनी ट्रान्स्फरची जमा रक्कम लुटल्याची घटना बुधवारी (ता.०२) सकाळी सव्वादहाच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबी-वराळे रस्त्यावरील इंद्रायणी पुलावर घडली.

फिर्यादी सुमन मिया मजबूर रहमान (२१,बाळकृष्ण ढोरे यांचे रुम नं.८,नवलाख उंबरे,मावळ,पुणे) हे सकाळी दहाच्या सुमारास सुमारास मनी ट्रान्सफरची जमलेली रक्कम २ लाख ८९ हजार रुपये रोख रक्कम दुचाकी क्रमांक एमएच १४ बी डब्लू १५५८ वरुन आंबी गावच्या हद्दीतून इंद्रायणी नदीच्या पुलावरुन आंबीकडून तळेगाव स्टेशनला घेऊन जात असताना,पुलाचे दक्षिण टोकाजवळ काळ्या पल्सर गाडीवरुन आलेल्या २० ते २२ वयोगटातील तीन अज्ञात इसमांनी गाडी अडवून,हातातील लोखंडी चैन आणि चाकूने अंगावर डोक्यात मारहाण करत,गंभीर जखमी करुन,जबरदस्तीने त्यांच्या जवळ असलेली रोख रकमेची बॅग घेऊन पसार झाले.

विशेष म्हणजे रहमान यांनी आरडाओरड करुन मदतीची याचना करुनही रस्त्यावरुन जाणारे इतर लोक मदतीला आले नाहीत. याप्रकरणी तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस पी पानसरे करीत आहेत. रहमान यांच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या असून,त्यांच्यावर तळेगावातील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

Web Title: Looted cash of Rs 2 lakh 75 thousand