पाऊस जोमात, पिके कोमात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात​ गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. धरणांतून सोडलेले पाणी शेतात घुसल्यामुळे शेतीचे नुकसान झाले असून, संततधार पावसामुळे तरकारी पिके सडू लागली आहेत. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  ​

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. धरणांतून सोडलेले पाणी शेतात घुसल्यामुळे शेतीचे नुकसान झाले असून, संततधार पावसामुळे तरकारी पिके सडू लागली आहेत. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  

मुळा नदी काठची शेते पाण्याखाली                 मुळशी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मुळा नदी काठची शेते पाण्याखाली गेली आहेत. मागील आठवड्यात लावलेली भातरोपे वाहून गेली आहेत, तर आधी लावलेली रोपे सडू लागली आहेत. मुसळधार पावसाने अनेक शेतीचे बांध तुटले असून भात खाचरांचेही नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्यावर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. 

घोड नदीकाठावरील कृषिपंप वाहून गेले         आंबेगाव तालुक्यात घोडनदी दुथडी भरून वाहत आहे. चास-कडेवाडी येथे पुराच्या पाण्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिके जलमय झाली आहेत. चासच्या कडेगाव येथील शेतकरी दशरथ भोर व रोहिदास भोर यांची घोडनदीलगत शेती आहे. त्यांनी शेतात चवळी व झेंडू पिकांची लागवड केली होती. चवळी पिकाची तोडणी सुरू होती. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतातील माती देखील वाहून गेली आहे. त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चास, साकोरे, नांदूर, कळंब आदी ठिकाणी घोडनदीवर असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंप वाहून गेले आहेत. तसेच बबन कानडे यांच्या उसात पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. 

तरकारी पिकांचे नुकसान 
आंबेगाव तालुक्‍यात दहा ते 12 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका लौकी, कळंब, चास, महाळुंगे पडवळ आदी गावांतील शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याने कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी पिके सडू लागली आहेत. तसेच, किडीचा उपद्रव वाढला आहे. मार्च ते एप्रिलदरम्यान टोकन पद्धतीने लागवड केलेल्या भुईमूग पिकाची काढणीची कामे रखडली आहेत. वेळेत काढणी न झाल्यास भुईमुगाच्या शेंगांना जमिनीतच मोड येण्याची शक्यता आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला, तर भुईमूग शेंगाचे नुकसान होऊन भुईमूग पीक वाया जाण्याचा धोका आहे. 
कळंब येथील शेतकरी संजय कानडे व आकाश अर्जुन कानडे यांच्या एक एकर क्षेत्रातील फ्लॉवर पिकात पाणी साचत असल्याने पीक सडू लागले आहे. 

नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी 
आंबेगाव तालुक्‍यातील भीमाशंकर आणि आहुपे परिसरात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या भागातील 56 आदिवासी गावांत भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या भातखाचरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of agriculture due to incessant rains in Pune