पितृपक्षातील जनता कर्फ्यूमुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे नुकसान

राजकुमार थोरात
Monday, 14 September 2020

 पितृपक्षाच्या काळामध्ये इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये जनता कर्फ्यू सुरु असल्याने शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांची भाज्या मिळविण्यासाठी दमछाक हाेत आहे.

 

वालचंदनगर : पितृपक्षाच्या काळामध्ये इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये जनता कर्फ्यू सुरु असल्याने शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांची भाज्या मिळविण्यासाठी दमछाक हाेत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने सर्वांच्या सहमतीने  तालुक्यामध्ये २० सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तालुक्यातील अत्याआवश्‍यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत.

तसेच इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये यापूर्वीच १५ दिवसांचा लॉकडाऊन यापूर्वीच जाहिर करण्यात आला होता.   भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हटले जाते. १ सप्टेंबर पासून पितृपक्षास सुरवात झाली आहे. १७ सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष सुरु राहणार आहे.

पितृपक्षामध्ये  दिवगंत पूर्वजांचे स्मरण मृत्यू झालेल्या तिथीस पिंडस्वरुपाने पुजन करुन पूर्वजांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. या दिवशी आपले मृत पूर्वज पितर रुपाने घरी येत असल्याची हिंदू धर्मामध्ये समजूत असल्याने पंधरा दिवस घरोघरी पुरणपोळीचा कार्यक्रम असताे. पुरणपोळीबरोबर पितृपक्षामध्ये कारले, शापू, भेंडी, आळू, गवारची व इतर भाज्यांची गरज असते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच याचबरोबर काकडी, मुळा, कोथींबिरीची वापर केला जातो. पितृपक्षामध्ये भाज्यांना चांगला दर मिळत असल्याने शेतकरी भाजीपाला लागवडीचे नियोजन करुन भाज्यांची विक्री करतो. तसेच या काळात ही भाज्यांचे दरही अचानक वाढतात. यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा होताे. मात्र चालू वर्षी कोरोना महामारीने शेतकऱ्यांचे सर्वच हिरावून घेतले आहे.

सध्या इंदापूरसह बारामती तालुक्यामध्ये कडक जनता कर्फ्यू असल्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये भाजीपाला विकता येत नाही. तसेच रस्त्यावर ही भाजीपाला विकण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

तर शेतकऱ्यांकडून ठोक दराने भाजीपाला घेवून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची ही अडचण निर्माण झाली असून त्यांचेही नुकसान होत आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या नुकसानीबरोबर सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला मिळविण्यासाठी दमछाक होत असून कोरोनामुळे सगळ्यांच्याच समोरील अडचणी वाढल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of farmers and traders due to public curfew