फूल उत्पादकांचे तिन्ही हंगाम वाया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

सतत होत असलेल्या पावसामुळे पुरंदर तालुक्‍यातील माळशिरस, पोंढे, टेकवडी या परिसरांतील फूल उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

माळशिरस-  सतत होत असलेल्या पावसामुळे पुरंदर तालुक्‍यातील माळशिरस, पोंढे, टेकवडी या परिसरांतील फूल उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गणपती, दसरा व दिवाळी हे तीनही हंगाम पावसामुळे वाया गेल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

पुरंदर तालुक्‍यातील पूर्व भागाच्या टोकाला असणारे पोंढे, माळशिरस, टेकवडी, आंबळे, राजेवाडी या गावांमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक फुलांचे उत्पादन घेतले जाते. येथील उत्पादक गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळी या काळात फूल विक्रीसाठी महत्त्वाच्या हंगामानुसार विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतात. ऐन उन्हाळ्यात मार्चपासून फुलांची लागवड करतात. शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर पेपर व्हाईट, पेपर यलो, भाग्यश्री, सेंट व्हाईट, मेरीगोल्ड, मानसी गोल्ड, राजा शेवंती, पौर्णिमा वाईट, पौर्णिमा यलो अशी विविध प्रकारची फुलांच्या जाती बंगळुरू येथून आणून लागवडी केल्या होत्या. दुष्काळामुळे बाहेरून कमी फुले येतील, अशी आशा होती. यामुळे यंदा या परिसरातील शेतकऱ्यांनी पुरंदर उपसाचे पाणी दुष्काळातही विकत घेऊन लागवडीचे प्रमाण दर वर्षीपेक्षा या वर्षी वाढवले होते. अत्यंत दर्जेदार प्रकारची फुलांचे मळे तयार झाले होते. मात्र, ही फुले तोडणीस आलेल्या वेळेतच पावसाला जोराची सुरवात झाली. इतर जातीची फुले नवरात्र-दसऱ्यापासून सुरू झाली. मात्र, याच काळात पुरंदर तालुक्‍यात संततधार पाऊस सुरू झाला. कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस दिवाळीपर्यंत सध्या चालू आहे. यामुळे शेतकऱ्याला फुले तोडणे देखील शक्‍य न झाल्याने फुले शेतातच खराब होऊन गेली. यामुळे फूल उत्पादकांचे हे तीनही हंगाम वाया गेले. यामुळे फुलांच्या लागवडीचा, रोपे, ड्रीप, खते, औषधे, मशागत, मजुरी हा सर्व खर्च निघू देखील शकला नाही. यामुळे फुलू उत्पादकांचे कोट्यवधीचे नुकसान होण्याबरोबरच पाऊस उघडल्यानंतर पुढील पिके करण्यासाठी भाग भांडवलदेखील राहिले नाही. या परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. 

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
फूल उत्पादक पुन्हा उभा राहावा, यासाठी झालेल्या नुकसानीचे सरकारने पंचनामे करावे, अशी मागणी पंचायत समितीच्या सदस्या सोनाली यादव, पोंढ्याचे सरपंच संपत वाघले, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, माऊली यादव, माउली बधे यांनी केली. यासाठी नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांची भेट घेणार, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of flower growers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: