लोणी काळभोर : बदलत्या हवामानाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका

लोणी काळभोर : बदलत्या हवामानाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका

लोणी काळभोर : सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरळी कांचनसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कांदा पीक वाचवण्यासाठी शेतकरी औषधांच्या फवारण्या करत आहेत. मात्र पुढील दोन दिवसात हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याने पुन्हा रोगराईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे हवेली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली आहे. त्यातच कांद्याला सध्या परिस्थितीत समाधानकारक बाजारभाव असल्याने शेतकरी या पिकाबाबत आशादायक आहेत. मात्र मागील चार दिवसांपासून सकाळी पडणारी थंडी व सातत्याने तयार होणारे ढगाळ वातावरण यामुळे कांदा पिकावर मावा, तुडतुडे, अशा किड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांद्याचे शेंडे करपणे, पात पिवळी पडणे, अशी विविध लक्षणे आढळून येत आहेत. त्यासाठी फवारणी केली तरच करपा रोग आटोक्यात येऊ शकतो.

दरम्यान, वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव जलदगतीने होत आहे. हा रोग आटोक्यात नाही आला तर कांदा पीक पूर्ण वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी कांद्याची लागवड करण्यासाठी मिळेल त्या किमतीत कांद्याचे बियाणे व कांद्याची रोपे खरेदी करून रोपे तयार केली होती. मात्र अतिवृष्टीने रोपे व बियाणे जमीनदोस्त झाली. त्यामुळे मिळेल त्या किमतीत कांद्याची रोपे व बियाणे शेतकर्‍यांनी घेतली आहेत.

पाऊण एकर कांदा पिकासाठी आतापर्यंत सुमारे चाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे. मागील तीन दिवसापासून ठगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. -निलेश तुपे शेतकरी, थेऊर फाटा, ता. हवेली

(संपादन : सागर डी. शेलार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com