दूधासाठी गमावला 28 लाखांचा ऐवज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

पुणे : चावी लावलेली दुचाकी रस्त्याच्याकडेला लावून दूध आणण्यासाठी गेलेल्या सराफी व्यावसायिकाची नजर चुकवून चोरट्याने दुचाकी पळविली. विशेषतः दुचाकीला लावलेल्या एका बॅगेमध्ये रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा तब्बल 28 लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटनाशुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजता शुक्रवार पेठेत घडली. 

पुणे : चावी लावलेली दुचाकी रस्त्याच्याकडेला लावून दूध आणण्यासाठी गेलेल्या सराफ व्यावसायिकाची नजर चुकवून चोरट्याने दुचाकी पळविली. विशेषतः दुचाकीला लावलेल्या एका बॅगेमध्ये रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा तब्बल 28 लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता शुक्रवार पेठेत घडली. 

याप्रकरणी राजेश सोलंकी (वय 48, रा.शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक व्हि.डी.केसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी यांचे रविवार पेठेमध्ये सराफ दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद करुन घरी निघाले होते. त्यांच्यासमवेत दुकानातील सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग होती. त्यांच्या मोपेड दुचाकीच्या मध्यभागी त्यांनी दागिन्यांची बॅग ठेवली होती. नेहमीप्रमाणे ते शिवाजी रस्त्यावरील फडगेट चौकातील सुयोग डेअरीसमोर दूध घेण्यासाठी थांबले. घाईगडबडीमध्ये त्यांच्याकडून चावी गाडीलाच राहिली. दूध घेऊन ते पुन्हा त्यांच्या दुचाकीकडे येण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दुचाकीवरील बॅगेमध्ये 9 लाख 80 हजार रुपयांची रोकड, 17 लाख 95 हजार रुपये किंमतीचे 565 ग्रॅम सोने व दुचाकी असा 28 लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला. या घटनेनंतर सोलंकी यांनी तत्काळ खडक पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

Web Title: Lost 28 lakh jewelry for milk