पिंपरी उपनगरही तहानलेलेच

पिंपरी  उपनगरही तहानलेलेच

पिंपरी -  मोशी, भोसरी, इंद्रायणीनगर, जुनी सांगवी, मोशी गाव, प्राधिकरण आदी उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

जुन्या सांगवीत तारांबळ
जुनी सांगवी -महापालिकेतर्फे आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. जुनी सांगवी परिसरात दर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असतो. मात्र, अनेक नागरिकांना पाणीकपात लक्षात न आल्याने व काहींकडे पाणी साठवणूक सुविधा नसल्याने त्यांना पाणी बंदचा परिणाम शनिवारी जाणवतो. त्यामुळे तारांबळ उडते. भाडेकरूंनाही त्याचा फटका बसत आहे. काही जण गुरुवारीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवतात. मोठ्या सोसायट्या एक दिवस टॅंकरचा आधार घेत आहेत. तसे पाणी साठवणुकीसाठी प्लॅस्टिक ड्रमला मागणी वाढली आहे. 

भोसरीत अपुरे पाणी
भोसरी -येथील खांडेवस्ती, चक्रपाणी वसाहतीच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. खंडेवस्तीत चोवीस तास पाण्याच्या जलवाहिनीसाठी आणि सांडपाणी वाहिनीसाठी रस्ते खोदले आहेत. त्यामुळे सार्वजनिक नळ बंद आहेत. काही जण मुख्य जलवाहिनीला पाइप जोडून पाणी घेत आहेत. त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी झुंबड उडालेली असते. चक्रपाणी वसाहतीच्या काही भागांतही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. 

दिघी, इंद्रायणीनगरही त्रस्त
इंद्रायणीनगरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. पेठ क्रमांक दोनमध्ये काम पूर्ण झालेले आहे, तरीही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दिघीतील भीमाशंकरनगर, साई पार्क, कृष्णानगर आदी भागांत गेल्या सहा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नवीन वस्तीत पुरेसे पाणी मिळत असून जुन्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळित आहे, असे गाऱ्हाणे नागरिकांनी मांडले. 

मोशी-प्राधिकरणात अवेळी पाणी
मोशी -स्पाइन रस्त्यालगतचा प्राधिकरणाचा भाग आणि पुणे- नाशिक महामार्गालगतच्या परिसरात सध्या कमी दाबाने आणि अवेळी पाणीपुरवठा होत आहे. प्राधिकरणातील पेठ क्रमांक चार, सहा, नऊ व अकरा आदी परिसरात कमी दाबाने आणि अवेळी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. तसेच, महामार्गालगतच्या बोराटे वस्ती, संजय गांधीनगर, गंधर्वनगरी, तापकीरनगर, दक्षिण लक्ष्मीनगर, शिवाजी वाडी आदी भागांमध्येही सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या भागामध्ये पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी हनुमंत लांडगे, विठ्ठल वाळुंज, विशाल बोराटे, गणेश आंबेकर आदींनी केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com