शहरात राज्यातील नीचांकी तापमान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे - जेमतेम नऊ दिवसांपूर्वी कपाटात गेलेले जर्किन, स्वेटर पुणेकरांना सोमवारी पुन्हा बाहेर काढावे लागले आहेत. कारण, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत नीचांकी  म्हणजे ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी पुण्यात झाली. राज्यातदेखील हे सर्वांत कमी तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस शहरात थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे पुण्यात ढगाळ वातावरण होते. हे वादळ पूर्व किनाऱ्याजवळ येत असतानाच पुणे शहर आणि परिसरातील ढगाळ वातावरण कमी झाले. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव रविवारी संध्याकाळपासून जाणवू लागला. त्यामुळे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुण्यात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.६ अंश सेल्सिअसने कमी झाला. 

शहरात अवघ्या नऊ दिवसांमध्ये किमान तापमानात चढ-उतार दिसून आली. गेल्या रविवारी (ता. ९) १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला किमान तापमानाचा पारा अवघ्या ४८ तासांमध्ये (मंगळवार, ता.११) ९.५ अंश सेल्सिअस नोंदला गेला. हे त्या वेळी हिवाळ्यातील सर्वांत नीचांकी तापमान होते. त्यानंतर पुढील चार दिवस म्हणजे शनिवारपर्यंत (ता. १५) किमान तापमानात सातत्याने वाढ झाली. रविवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नोंदलेल्या किमान तापमानात सहा दिवसांनंतर पहिल्यांदा घट झाली. त्यानंतरच्या अवघ्या चोवीस तासांमध्ये किमान तापमान ४.२ अंश सेल्सिअसने घसरून ८.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे ९ ते १७ डिसेंबर या दरम्यान किमान तापमान ६.७ अंश सेल्सिअसने कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविले गेले आहे. 

दरम्यान, ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा झाले. पूर्व विदर्भात सोमवारी पावसाच्या सरींनी हजेरी लावली, तर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने मध्य महाराष्ट्राला हुडहुडी भरली. पुणे, नगर, जळगाव, नाशिक येथे नीचांकी तापमानाची नोंद होत पारा ८ अंशांपर्यंत घसरला.

Web Title: The lowest temperature in the city