‘एम. जे. ५’चा मुनवॉक स्टाइल नजराणा

mj-five
mj-five

भारतात नृत्याची क्रेझ ही तरुणांमध्ये सर्वाधिक आहे. अनेक शोच्या माध्यमातून नृत्य करणारे स्पर्धक आणि ग्रुप आपल्या कलागुणांसह समोर येतात. आपली अनोखी स्टाइल लोकांसमोर आणून त्यांच्या मनात घर केलेला ग्रुप म्हणजे ‘एम. जे. ५’. मुनवॉक स्टाइल ही या ग्रुपची खासियत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ च्या दिमाखदार सोहळ्यात ‘एम. जे. ५’ ग्रुपने नृत्य सादर केले. आजवरच्या प्रवासाबद्दल या ग्रुपच्या हिमांशू गोला, आर. कार्तिक, रोहित सिंग, विष्णू कुमार आणि डेनिस अँथोनी यांच्यासोबत मारलेल्या गप्पा...

‘एम. जे. ५’ ड्रान्स ग्रुप कसा तयार झाला?
कॉलेजपासूनच आम्ही सर्वच डान्स करत होतो. वेगवेगळ्या नृत्य स्पर्धांमधून आम्ही वैयक्तिक पातळीवर सहभाग घेत होतो. दिल्ली विद्यापीठाच्या एका नृत्य स्पर्धेदरम्यान आम्ही सर्व एकत्र आलो. ‘एम. जे. ५’ या ग्रुपमधील सर्व सदस्यांची नृत्याची शैली सारखीच आहे. शिवाय आम्हा पाचही जणांना नृत्यामध्येच करिअर करायचे होते. त्यानंतर ‘इंडियाज डान्सिंग सुपरस्टार’ या शोसाठी ऑडिशन द्यायचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच ऑडिशनसाठी आम्ही प्रॅक्‍टिसला सुरुवात केली होती; हा शो आम्ही जिंकलो. अशाच पद्धतीने आम्हा सर्वांचा आणि ‘एम. जे. ५’ या ग्रुपचा प्रवास सुरू झाला. 

तुमच्या चाहत्यांना नवीन काय पाहायला मिळणार?
नृत्याचा देव असलेल्या मायकल जॅक्‍सनची प्रेरणा घेऊन आम्ही प्रवास करतोय. ‘एम. जे. ५’ या ग्रुपची तीच खासियत आहे. वेगवेगळ्या हिंदी आणि इंग्रजी गाण्यांचे रिमिक्‍स घेऊन आम्ही त्यावर स्लोमो आणि मुनवॉक करतो. युट्यूबवरून ‘एम. जे. ५’ला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत असते. दिवसेंदिवस सबस्क्रायबर वाढत आहेत. २०२० या नवीन वर्षात आम्ही लवकरच एका चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहोत. त्याव्यक्तिरिक्त अनेक डान्स शोसाठी आमची तयारी सुरू आहे.

स्टेवर नृत्य करताना मनात काय भावना असते?
आमच्या अनोख्या नृत्य शैलीमुळे देशभरातून प्रेम मिळाले आहे. मायकल जॅक्‍सनकडून प्रेरित होऊन त्यांच्यासारखे नृत्य करताना वेगळीच भावना असते. नृत्याआधी बरीच प्रॅक्‍टिस असते. गाण्यांची निवड करताना आम्ही सर्वच खूप विचार करतो. शिवाय डान्स करताना आम्हा सर्वांमध्ये समन्वय राखणे गरजेचे असते. याच प्रयत्नातून गेल्या चार वर्षांत आम्ही २६ प्रकारच्या वेगवेगळ्या मुनवॉकच्या डान्स मुव्हस करतो आहोत. प्रत्येक मुनवॉक हा वेगळा आहे. 

‘सकाळ’ या उपक्रमाबद्दल काय प्रतिक्रिया आहे?
नृत्यासाठी वेगवेगळ्या शहरात जाण्याचा योग हा येतच असतो. पुण्यामध्ये याआधी आम्ही अनेक नृत्यप्रयोग सादर केले आहेत; पण सलग दुसऱ्यावर्षी ‘सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ कार्यक्रमात नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. त्याविषयी आम्हाला खूप आनंद वाटतो. या उपक्रमाने तरुणींना त्यांच्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळाले आहे.
(शब्दांकन - ऋतुजा कदम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com