चिमुरड्यांच्या हृदयासाठी सप्तसुरांची जादू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

"लिट्‌ल चॅंप्स फॉर लिट्‌ल हार्ट' कार्यक्रमाने रसिक भारावले 

मार्केट यार्ड : पुणेकर रसिकांनी एक रम्य, अविस्मरणीय अशी "सप्तसुरांच्या जादू'ने भारलेली संध्याकाळ अनुभवली. बालगायकांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद रसिकांनी घेतला. निमित्त होते दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील मुला-मुलींसाठी हृदय शस्त्रक्रियेच्या निधी संकलनाचे.

"लिट्‌ल चॅंप्स फॉर लिट्‌ल हार्ट' या आगळ्यावेगळ्या सुरेल संगीत आणि नाट्य गीतांच्या कार्यक्रमामुळे रसिकांना संगीताच्या विविध प्रकारांची अनुभूती घेता आली. राम मंगल हार्ट फाउंडेशन व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. या वेळी "सूर नवा- ध्यास नवा' आणि "सारेगमप' गाजविलेले कलाकार, गायक अंशिता चोणकर, मीरा निलाखे, उत्कर्ष वानखेडे, शुभम खंडाळकर, तबलावादक सोहम गोराणे यांच्यासह ढोलकीवादक नीलेश परब, हार्मोनिअमवादक कमलेश भडकमकर, कीबोर्डवादक सत्यजित प्रभू, गिटारवादक मनीष कुलकर्णी, बासरीवादक वरद काठापूरकर, तबलावादक अर्चिस लेले, ऑक्‍टोपड दत्ता तावडे यांचा कार्यक्रमात सहभाग होता. 
मराठी गाणी, लावणी, शास्त्रीय संगीत, पाश्‍चात्त्य, नाट्य गाण्याचे विविध आविष्कार यात सादर झाले.

कार्यक्रमाची सुरवात उत्कर्ष वानखेडे याने "शकुंतला'मधील नांदी या गीताने झाली. त्यानंतर विविध चित्रपटांमधील गीते बालगायकांनी गायिली. मंगेश वाघमारे यांच्या सूत्रसंचालन आणि कल्पनाविष्कारातून सादर झालेल्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात घर केले. मनीष फिरोदिया यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले. "सकाळ' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक होता. 

नीलेश परब यांना प्रेक्षकांची दाद 
"दे धक्का' चित्रपटातील "उगवली शुक्राची चांदणी' या लावणीवेळी नीलेश परब यांनी ढोलकी वादनाचा एक आगळावेगळा आविष्कार सादर केला. यामुळे अनेक प्रेक्षकांनी वन्स मोअर, शिट्ट्या अन्‌ टाळ्यांनी भरभरून दाद दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The magic of the Seven Seas for the hearts of boys