‘महाबॅंकेच्या पदाधिकाऱ्यांवर अभ्यास न करता कारवाई’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - ‘‘महाराष्ट्र बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी नियमांचा अभ्यास न करता घाईने कारवाई केली आहे. यामुळे बॅंकिंग क्षेत्रात घबराटीचे वातावरण असून, त्याचा कर्जपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या प्रकरणात आता केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष घालावे लागेल,’’ असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

अनास्कर म्हणाले, ‘‘डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात ठेवीदारांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिस बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू शकत नाहीत. या पदाधिकाऱ्यांनी नियमभंग करून कर्ज दिले असेल, तर त्यांना रिझर्व्ह बॅंक संबंधित बॅंक दंड करू शकते. तसेच, कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंकेने त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली, तरच पोलिसांना कारवाई करता येते.’’

‘‘महाराष्ट्र बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई नियमाला धरून नाही. एखाद्या कामासाठी कर्ज दिले आणि त्यासाठी ते वापरले नाही, तर यात बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांना कसे दोषी ठरविता येईल? अशाप्रकारे पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली, तर कोणत्याच बॅंकेचे पदाधिकारी सामान्यांना कर्ज देण्यासही तयार होणार नाहीत. अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्तरावरून या विषयात लक्ष घालावे लागणार आहे,’’ असे अनास्कर यांनी सांगितले.

Web Title: mahabank officer crime