Mahabrand : देशातल्या पहिल्या साखर कारखान्यापासून ते कु-कूच-कु चिकन पर्यंत, असा आहे पुण्याचा बोरावके पॅटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahabrand

Mahabrand : देशातल्या पहिल्या साखर कारखान्यापासून ते कु-कूच-कु चिकन पर्यंत, असा आहे पुण्याचा बोरावके पॅटर्न

Mahabrand - कल्पकता, प्रयोगशीलता, उद्यमशीलता आणि व्यावसायिकता यांचा संगम म्हणजे यश. अशा यशाला जेथे सामाजिक जाणिवेची जोड मिळते, तेथे उभे राहते देशविकासाचे मॉडेल. उदय बोरावके यांनी आपल्या कृषी व्यवसायातून ग्रामविकासाचे ‘बोरावके मॉडेल’ उभारून देशासमोर एक आदर्श ठेवला आहे. कृषी व उद्योग भागीदारीवर

१५ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या राष्ट्रीय एकदिवसीय संमेलनामध्ये तत्कालीन महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री मा. शरदचंद्रजी पवारसाहेब, विविध राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय अर्थमंत्री व इतर कृषीविषयक व्यक्तींच्या उपस्थितीत उदय बोरावके यांनी ‘बोरावके मॉडेल’ ही संकल्पना सादर केली. त्यात त्यांनी किसानों को दाम। ग्रामीण नौजवानों को काम।। हा संकल्प दिला. आयुष्यभर कृषिमालाच्या मूल्यसंवर्धनाचा ध्यास घेऊन हे मॉडेल विकसित केले आहे.

उदय बोरावके करीत असलेल्या कामामागे ग्रामविकासाची तळमळ आहे. शेती हाच या विकासाचा आधार आहे, हे त्यांच्या वडिलांनी म्हणजे रावबहादूर नारायणराव बोरावके यांनी स्वकर्तृत्वातून सिद्ध केलेले आहे. त्यांची प्रेरणा उदय यांच्या पाठीशी आहे. शेतकरी सुखी, तर जग सुखी, या प्रेरणेतून ते आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिले. रावबहादूर नारायणराव हे महाराष्ट्रातील प्रथितयश प्रगतिशील शेतकरी. त्यांनी विविध फळबागा, गुळाची गुऱ्हाळे, सिंचनाच्या आधुनिक सोयी, ट्रॅक्टर व मेकॅनिकल पद्धतीने शेतीव्यवसाय केला. तसेच आई स्व. लक्ष्मीबाई व आजी

स्व. सखूबाई यांनी डेअरी, कुक्कुटपालन, शेळी व ससेपालन असे शेती आणि शेतीपूरक अनेक व्यवसाय करून त्यांच्या कामात साथ दिली. नारायणराव यांनी भारतातील आदर्श शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविला होता. स्वतः उत्पादित केलेल्या शेतीमालाची त्यांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे ‘मे. नारायणराव बोरावके सन्स’ या नावाने विक्री सुरू केली. शेती व्यवसायातून भांडवल जमवून त्यांनी महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार एकर शेती विकसित केली.

१९३२ मध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथे महाराष्ट्रातील ४०० शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी तत्त्वावरील ‘दि सासवड माळी शुगर फॅक्टरी प्रा. लिमिटेड’ हा देशातील पहिला साखर कारखाना सहकाऱ्यांच्या मदतीने उभारला. शेतीला पूरक ॲग्रो इंडस्ट्रीज, द्राक्ष व विविध पिकांच्या संघटनांची बांधणी केली. ब्रिटिश सरकारने १९३३ मध्ये त्यांना ‘रावसाहेब’; तर १९४५ मध्ये कृषी, कृषिपूरक व्यवसाय, कृषिउद्योग व ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.

त्यांनी १९६२ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघा’ची स्थापना केली. आज या संघाद्वारे ३२,००० द्राक्ष उत्पादक सभासदांना द्राक्षाच्या संशोधनापासून निर्यातीपर्यंत सुविधा आणि लाभ मिळत आहेत. पहिला सहकारी साखर कारखानाही नारायणराव यांच्या मार्गदर्शनाखालीच उभारला गेला आहे. शेतीविषयीचा व्यावसायिक दृष्टिकोन प्रत्यक्ष व्यवहारात आणताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. वडिलांच्या कार्याचा हा वारसा उदयराव आज जपत आहेत.

उदय व त्यांची पत्नी नीलिमा हे दोघे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी १९७४ मध्ये अमेरिकेत गेले असता, कोंबडी शिजवून विक्री करण्याबाबतची माहिती त्यांना मिळाली. स्वयंपाकात प्रवीण असणाऱ्या नीलिमाजींनी त्या माहितीचा उपयोग ‘उदय बागे’त अतिशय यशस्वीपणे करून घेतला. १९७७ मध्ये ‘बोरावके कु-कूच-कु चिकन’ची मुहूर्तमेढ सौ. निलीमा बोरावके व श्री. उदय नारायणराव बोरावके यांनी शेतामध्ये फार्म किचनची स्थापना करून रोवली. ग्राहकांपर्यंत अत्यंत सकस व निरोगी स्वादिष्ट अन्न विविध प्रकारच्या शिजविलेल्या कोंबडीचे पदार्थ- ज्यामध्ये प्रामुख्याने तंदूर चिकन, तंदूर कबाब, फ्राईड चिकन, चिकन बिर्याणी,चिकन सूप यांचा समवेश होता- सौ. नीलिमा यांनी आपल्या शेतामध्ये स्थापन केलेल्या

‘कु-कूच-कु फार्म सेंट्रल किचन’मध्ये स्वत: लक्ष घालून तयार करण्यास

सुरुवात केली. अत्यंत उत्तम दर्जाच्या व प्रतीच्या शिजविलेल्या पदार्थाची निर्मिती करण्यासाठी शेतामधून लागणारा माल मसाला, कांदे, बटाटे, लसूण व इतर विविध प्रकारच्या स्वयंपाकाला लागणाऱ्या गोष्टी उत्तम ठिकाणाहून खरेदी करतात. रोज स्वच्छ व ताजे पदार्थ ‘उदय बाग’ येथील ‘कु-कूच-कु सेंट्रल किचन’मधून ८० टक्के शिजवून तयार करून पाठवले जातात.

सौ. नीलिमा या स्वयंपाकमध्ये अत्यंत प्रवीण आहेत व त्यांच्या प्रयत्नांमुळे १९७७ सालापासून आजपर्यंत चविष्ट पदार्थ ग्राहकांना पुण्यामध्ये डेक्कन जिमखाना येथील जंगली महाराज रोड, पीएमपीएमएल बस टर्मिनस समोर, ‘बोरावकेज कु-कूच-कु चिकन’च्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. हे ओपन एअर रेस्टॉरंट रोज सायंकाळी ४.३० वाजता सुरू होते. तेथे ग्राहकांना बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. तसेच पार्सल सुविधा झोमॅटो, स्विगीच्या माध्यमातून उपलब्ध आहे. तंदूरमध्ये चिकन शिजविताना ‘उदय बाग’ येथील डेअरी फार्ममध्ये संगोपन केलेल्या गीर गायीचे A2 दूध व त्या दुधापासून तयार केलेले उच्च दर्जाचे दही तंदूर मॅरिनेशनसाठी वापरण्यात येते. तसेच गीर गायीच्या दुधापासून पनीर, बटर तयार केले जाते.

डेअरीतील गायींसाठी लागणारा सकस चारा ‘उदय बागे’मध्ये निर्माण होतो. ‘उदय बागे’ची नावीन्यपूर्ण संकल्पना ही मिक्स अॅक्टिव्हिटी फार्म मिक्स इकॉनॉमिक फार्म मॉडेलमधून स्थापन झालेली आहे.

नीलिमा बोरावके या प्रथितयश समाजसेविका अाहेत. पुणे वुमेन्सच्या व रोटरी इनरव्हील कल्बच्या माजी अध्यक्षा आहेत. या माध्यमातून अंध मुली, अनाथ मुले, स्त्रियांसाठीचे वृद्धाश्रम व इतर संस्था यांना त्या मदत करीत असतात.

‘उदय बागे’तून शेतीला सुरुवात

१५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन. याच दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळच्या राहता गावी उदय बोरावके यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण श्री शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूलमध्ये झाले. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र व युद्धशास्त्र या विषयांत पदव्या संपादन केल्या. शेतजमिनीची-मशागतीची देखरेख करणे, जनावरांना घास घालणे,

हा त्यांचा लहानपणीचा नित्यक्रम होता. त्यांच्या घराण्याची पिढ्यान्‌ पिढ्या शेतीशी नाळ जोडलेली आहे. स्वाभाविकपणे लहानपणापासूनच त्यांच्यात शेतीची आवड निर्माण झाली. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र, लष्करी शास्त्र या विषयांचा अभ्यास करून बी.ए.ची पदवी संपादन केलेल्या उदय यांना परदेशात करिअर घडविणे शक्य असताना वडिलांच्या प्रेरणेतून त्यांनी कार्यक्षेत्र म्हणून शेतीची निवड केली. अर्थात, वडिलांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा लाभला म्हणून त्यांनी थेट ‘ॲग्रि बिझिनेस मॉडेल’ मांडून लोकांना शहाणपण शिकविले नाही. अष्टपैलू कृषिपुत्र म्हणून शेतापासून सुरू झालेला हा प्रवास ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचला. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘फार्म टू फोर्क’ हे शेतापासून ताटापर्यंत शेतमाल पोहोचविणारे देशातील यशस्वी असे बोरावके मॉडेल तयार झाले. त्यांनी १९६८ मध्ये पुण्याजवळ ‘उदय बाग’ फार्ममध्ये मिश्रशेतीची सुरुवात केली. यामध्ये शेती आणि पशुपालन यांचा समावेश होता. त्यांच्या या प्रयोगशीलतेचा प्रारंभ ‘पिग फार्म’ आणि ब्रॉयलर चिकन पोल्ट्रीच्या माध्यमातून झाला. ‘उदय बाग’ येथील पडीक जमिनीवर ‘गुलमोहर वराहपालन’ नावाने पिगरीचा कृषीसंलग्न व्यवसाय सुरू केला. या प्रकल्पात अतिशय स्वच्छता राहण्यासाठी स्वच्छता प्रक्रिया प्रकल्प उभारला. अशा पद्धतीने उत्पादन केलेले पोर्क त्यांनी स्वतः मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचविले. त्यांचे पिगरीमधील ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले. यासाठी त्यांना अमेरिकेतील बॅब्कॉक पिग ब्रीडिंग फार्म या कंपनीच्या मालकाने भारतात पिग ब्रीडिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्तावही दिला.

दूध उत्पादन, पोल्ट्रीत यश

उत्तम प्रतीच्या वराह मांसावर प्रक्रिया करून तयार केलेल्या अन्य उत्पादनांमुळे बोरावके यांच्या या अभिनव प्रयोगाचा लौकिक सर्वत्र पसरला. वराहपालनाप्रमाणेच गोपालनातही त्यांनी आधुनिक पद्धती आणि तंत्राचा वापर केला. त्याआधारे उत्तम जातीच्या गायींची पैदास करून दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यातही त्यांनी यश मिळविले होते. त्यांची कल्पकता, प्रयोगशीलता, उद्यमशीलता आणि व्यावसायिकता याचे उत्तम दर्शन घडले ते त्यांच्या ‘बोरावके चिकन’ या ब्रँडमध्ये. मटण व चिकनची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी १९६९ मध्ये पोल्ट्रीसाठी हॅचरी म्हणून ब्रॉयलर चिकनचा जोडधंदा सुरू केला. ब्रॉयलर पिल्ले आणून त्यांचे संगोपन केले. त्या काळात पोल्ट्री व वराहपालन व्यवसाय नवीन होता. पशुवैद्यकीय डॉक्टर आणि कुशल कामगारांचा अभाव होता. त्यामुळे त्यांनी विविध सरकारी व खासगी संस्थांना भेट देत चिकन प्रोसेसिंगचे तंत्र आत्मसात केले. अमेरिकेतील कॉलेजमधील भारतात आलेल्या पोल्ट्री व प्रक्रिया उद्योगातील प्रशिक्षित विद्यार्थी-स्वयंसेवकांचेही त्यांनी यासाठी मार्गदर्शन घेतलेे. पुण्यातील ‘उदय बागे’त एक आधुनिक पोल्ट्री उभी राहिली. शेतमालाच्या मूल्यसंवर्धनाची जी कल्पना त्यांनी बोरावके मॉडेलद्वारे मांडली, ती त्यांनी खऱ्या अर्थाने व परिणामकारकरीत्या विकसित केली ती पोल्ट्री उद्योगामध्ये. काळाशी सुसंगत राहून, बदलत्या जीवनशैलीचा अभ्यास करून या जीवनशैलीला उपयुक्त ठरतील अशा प्रक्रिया करून उत्पादने बाजारात आणल्यास, उत्पादनाचे मूल्य तर वाढतेच, शिवाय ती लोकमान्यही होतात, हे ‘बोरावके चिकन’ला मिळालेल्या यशातून स्पष्ट झाले. प्रक्रियाकृत ड्रेस्ड चिकनपासून ‘रेडी टू ईट’ तंदूर खाद्यपदार्थांपर्यंत झालेल्या ‘बोरावके चिकन’च्या यशस्वी प्रवासामागे मूल्यसंवर्धनाची संकल्पना आहे.

राष्ट्रीय कृषी धोरणात सहभाग

उदय बोरावके यांना केंद्र सरकारने सन २०१०-११, सन २०११-१२, सन २०१२-१३ वार्षिक अर्थसंकल्प आराखडा समितीमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर प्रतिनिधी म्हणून कृषी, कृषी व्यवसाय व संलग्न विषयाची अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद काय असावी, यासाठी निमंत्रित केले. दिल्ली येथे प्रणव मुखर्जी व पी. चिदंबरम या अर्थमंत्र्यांबरोबर विचारविनिमयास ते आमंत्रित होते. महाराष्ट्र राज्यासाठी कृषी व संलग्न व्यवसायासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प इतर पाच राज्यांप्रमाणे करण्यासाठी उदय बोरावके यांचा अभ्यास गटात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग धोरण संकल्प मसुदा उदय यांनी महाराष्ट्र शासनाबरोबर तयार केला. त्यांचा मोलाचा सहभाग होता. या आर्थिक तरतुदीमध्ये देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला, गावामध्ये तयार झालेल्या कृषिमालाला गोडाऊन व कोल्ड स्टोअरेज बांधण्यासाठी ५,००० कोटी रुपयांची तरतूद नाबार्ड बँकेद्वारे केली होती. ग्रामविकासाच्या तळमळीमुळे केवळ मॉडेल तयार करून न थांबता ते वास्तवात आणण्यासाठी १६ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी ‘रावबहादूर बोरावके सेंटर फॉर ॲग्रिप्रिन्युअरशिप’ ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेमार्फत कृषी व्यावसायिकांना शिक्षित करण्यासाठी प्रशस्त हॉल उभा केला आहे. तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान, शेतमालाचे मूल्यवर्धन, पणनव्यवस्था आणि निर्यात या विषयांवर प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. त्यामुळे कृषिप्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यास मदत होत आहे.

मूल्यवर्धित शेती

कार्यक्रम गरजेचा

ते म्हणतात, ‘‘आपल्या देशाने आणि राज्यानेही १९६० च्या दशकात हरितक्रांती घडविली. कृषी शास्त्रज्ञांची दूरदृष्टी, कृषी खात्याची तत्परता आणि बळीराजाचे कष्ट यांतून ती साकारली. यातून वाढलेल्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करण्याच्या दृष्टीने असाच एकात्मिक प्रयत्न १९८० च्या दशकात केला गेला असता, तर आज शेती आर्थिक संकटात सापडली नसती. किंबहुना, शेतमालाच्या साठवणुकीच्या व्यवस्थेअभावी वर्षाकाठी एक लाख हजार कोटी रुपयांचे कृषी उत्पादन वाया गेले नसते. आज त्यामुळे शेतकऱ्यांचे पर्यायाने देशाचे मोठे भांडवली नुकसान होत आहे. ते टाळायचे असेल, तर बांधाबाहेरच्या मूल्यवर्धन शेतीचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.’’

शेतीमाल मूल्यवर्धनाचे

‘बोरावके मॉडेल’

भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. त्यासाठी कृषी क्षेत्रातील प्राथमिक शेती, दुय्यम शेती व बाजारक्षम शेती बळकट करणे, ही सध्याची गरज आहे. रावबहादूर बोरावके यांनी लिहिलेली म्हण, ‘शेतकरी सुखी, तर जग सुखी!’ याच विचारांच्या आधारावर कृषिमालाचे मूल्यवर्धन, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, कृषीवर आधारित उद्योगांना चालना, आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारणे, ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला बळकटीकरणाच्या उद्दिष्टाने उदय यांनी ‘बोरावके मॉडेल’ची निर्मिती केली आहे. ‘किसानों को दाम और ग्रामीण नौजवानों को काम’ हा संकल्प त्यांनी यात दिला आहे.

प्राथमिक शाळेतच शेतीचे ज्ञान

शेतीमध्ये काढणीपश्चात कार्यप्रणालीत शेतकऱ्यांमध्ये हवी तेवढी कुशलता नाही, हे लक्षात आल्यावर उदय यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांतील कुलगुरूंशी चर्चा करून शेतमालाचे काढणीपश्चात प्रक्रिया तंत्र हा अभ्यासक्रम राहुरीतील ‘महात्मा फुले कषी विद्यापीठा’द्वारे १२ महाविद्यालयांत सुरू केला. यातून शेतमालाच्या मूल्यवर्धनाबरोबरच फूड इंडस्ट्रीला निर्यातदार आणि फूड मॉलला हजारो कुशल कामगार मिळाले. शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शाळेतच शेती विषयाचे ज्ञान मिळावे म्हणून उदय यांनी पुरंदर तालुक्यातील चांबळी व कोडीत येथील कृषी विद्यालयात २०१७ ते २०१८ मध्ये ७ वी ते ९ वीच्या वर्गात ‘बोरावके कृषी व कृषिसंलग्न अभ्यासक्रम’ आणि ‘बोरावके कृषी ज्ञानगंगा सायब्ररी’ हे उपक्रम ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते सुरू केले.

संपर्क : Email Id : rbcap125@gmail.com

टॅग्स :Farmer