राजीव गांधी वसाहतीचे स्थलांतर लवकर करा; महामेट्रोची महापालिका "एसआरए'कडे मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

मेट्रोच्या शहरातील एकात्मिक स्थानकासाठी शिवाजीनगर न्यायालयाजवळील राजीव गांधी कामगार वसाहतीचे तातडीने स्थलांतर करावे, अशी मागणी महामेट्रोने महापालिकेकडे केली आहे. 

पुणे - मेट्रोच्या शहरातील एकात्मिक स्थानकासाठी शिवाजीनगर न्यायालयाजवळील राजीव गांधी कामगार वसाहतीचे तातडीने स्थलांतर करावे, अशी मागणी महामेट्रोने महापालिकेकडे केली आहे. 

शिवाजीनगर न्यायालयाजवळ महामेट्रोचे भूमिगत आणि एलिव्हेटेड स्थानक होणार आहे. हिंजवडी - शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचेही स्थानक तेथे असेल. वनाज- रामवाडी, पिंपरी - स्वारगेट मार्गावरील स्थानक तेथेच असेल. तिन्ही मेट्रो मार्ग एकाच ठिकाणी मिळणारे हे शहरातील एकमेव स्थानक आहे. या स्थानकाच्या आवारात महामेट्रो भव्य व्यापारी संकुल उभारणार आहे. सुमारे 17 मजली संकुलात दोन मोठे पार्किंग लॉट्‌स असतील, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. या स्थानकासाठी डेंगळे पुलाच्या बाजूने आणि संगम पुलाच्या बाजूने महामेट्रोचे काम सुरू झाले आहे. परंतु आता भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम रखडले आहे. त्यासाठी राजीव गांधी कामगार वसाहतीमधील सुमारे 800 ते 1000 हजार कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्याबाबत महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) यांच्यात चर्चा सुरू आहे. झोपडपट्टीधारकांना लोहगाव, विमानतळ येथील "एसआरए' प्रकल्पांमध्ये स्थलांतरीत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्या बाबत अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. मात्र जागा उपलब्ध होत नसल्यामुळे मेट्रोच्या एकात्मिक स्थानकाचे काम करायचे कसे, असा प्रश्‍न महामेट्रोपुढे निर्माण झाला आहे. 

आकाशवाणीची जागा मेट्रोला 
शिवाजीनगर स्थानक परिसरात मेट्रोचे भूमिगत स्थानक तसेच भूमिगत पादचारी मार्ग तयार करण्यासाठी महामेट्रोला एसटी महामंडळाकडून जागा उपलब्ध झाली आहे. तसेच आकाशवाणीनेही सुमारे दोन हजार चौरस फूट जागा नुकतीच महामेट्रोला उपलब्ध करून दिली आहे. तेथील 25 झाडांचे पुनःरोपण तळजाई टेकडीवर करण्यात येणार असल्याचेही महामेट्रोकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahametro demand to municipal