रुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि मेट्रोच्या मार्गाची जागा पाहणी करून निश्‍चित केली. महापालिकेने येथील रस्ता रुंदीकरणाचे काम गतीने केल्यास, या भागातील मेट्रोचे खांब उभारणीचे काम महिन्यात हाती घेण्यात येईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

‘खडकीतील मेट्रोचे काम रखडले’ ही बातमी ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. २५) प्रसिद्ध झाली. त्यामुळे महापालिका आणि महामेट्रोच्या प्रशासनाने वेगाने हालचाली करीत काल तातडीने बोपोडीतील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. संरक्षण विभागाकडून रस्ता रुंदीकरणाला, तसेच मेट्रोच्या कामाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मात्र, हॅरिस पुलापासून खडकी कॅन्टोन्मेंटची हद्द सुरू होईपर्यंत सुमारे नऊशे मीटर रस्ता पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. महापालिकेच्या हद्दीतील २१ मीटर रस्त्याचे ४२ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, या रस्त्यावरील बोपोडी चौकातील पाच जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांकडील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्या जागांचा ताबा मिळाल्यानंतर हे रुंदीकरण पूर्ण होईल.

भूसंपादन अधिकाऱ्यांकडून जागा ताब्यात मिळाल्यानंतर, तातडीने रस्ता रुंदीकरण पूर्ण केले जाईल. सत्तर टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात असून, तेथील काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. खडकी रेल्वेस्थानकाची संरक्षक भिंत रस्त्याच्या बाजूने दहा फूट पुढे असल्यामुळे रस्ता दुभाजकाची जागा निश्‍चित करण्यात अडचण आली होती.
- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका

Web Title: mahametro pole