Maratha Kranti Morcha : पुणे जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

जनार्दन दांडगे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

बंदबाबत अधिक माहिती देताना संदीप पाटील म्हणाले, बारामती, खेड, दौंड, भोर, शिरूर, जुन्नर व मावळ या तालुक्यातील इंटरनेट सेवा सकाळी नऊ वाजलेपासुन बंद ठेवण्यात आली आहे.

लोणी काळभोर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बारामती, खेडसह जिल्ह्यातील सात तालुक्यामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून पुढील आदेश मिळेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर बंद दरम्यान संपुर्ण जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी अडीचशेहून वरिष्ठ अधिकारी व सव्वादोन हजार पोलिस कर्मचारी सतर्क असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पाटील यांनी दिली. 

बंदबाबत अधिक माहिती देताना संदीप पाटील म्हणाले, बारामती, खेड, दौंड, भोर, शिरूर, जुन्नर व मावळ या तालुक्यातील इंटरनेट सेवा सकाळी नऊ वाजलेपासुन बंद ठेवण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने 30 जुलैला पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनात चाकण येथे मोठ्या प्रमानात दंगल उसळली होती. या दंगलीदरम्यान इंटरनेटवरुन काही खोट्या पोस्ट व्हायरल झाल्याने, दंगलीचा भडका उडाला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वरील सात तालुक्यात इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर बंद शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांनी केलेल्या उपाय योजनाबाबत बोलताना पाटील म्हणाले, अडीचशेहून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह दोन हजार दोनशे पोलिस कर्मचारी डोळ्यात तेल घालून बंद शांततेत पार पडावा यासाठी कार्यरत आहेत.

पोलिसांच्या जोडीला नऊशे गृहरक्षक दलाचे कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या तीन चुकड्या व एक शिघ्र कृती दल पाचारण करण्यात आले आहे. तीन अतिरिक्त पोलिस अधिक्षक व दहा पोलिस उपविभागीय अधिकारी जिल्हात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची नोंद घेत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शांततेत रस्ता रोको करण्यात आले आहेत. जिल्ह्यात बंद शांततेत चालू आहे.

Web Title: Maharashtra Bandh Maratha Kranti Morcha Pune District Huge Police Security