Maratha Kranti Morcha : पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद 

संदीप घिसे 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

शहरातील दुकानदारांनी आपली दुकाने उघडलीच नाहीत. एक दिवस अगोदर बहुतांश दुकानदारांनी दूध वितरकांना दूध घेणार नसल्याचे सांगितले. यामुळे चितळे, गोकूळ यासारख्या दुधाचा पुरवठा शहरात झाला नाही.

पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरात बंदला 100 टक्‍के प्रतिसाद मिळाला आहे. हिंजवडी, भोसरी, रावेत परिसरात मराठा तरुणांनी दुचाकी रॅली काढली. तर हिंजवडीत काहीकाळ रास्तारोको करण्यात आला. शहरातील काही भागांमध्ये पेट्रोल पंप आणि मेडिकलची ही अत्यावश्‍यक सेवाही बंद असल्याचे दिसून आले. 

शहरातील दुकानदारांनी आपली दुकाने उघडलीच नाहीत. एक दिवस अगोदर बहुतांश दुकानदारांनी दूध वितरकांना दूध घेणार नसल्याचे सांगितले. यामुळे चितळे, गोकूळ यासारख्या दुधाचा पुरवठा शहरात झाला नाही. इतर ब्रॅंडचे दूध काही ठिकाणी उपलब्ध होते. मात्र 54 रुपयांचे म्हशीच्या दुधाची विक्री 60 रुपयांना होत होती. शहरातील पीएमपीएमएलची वाहतूक सुरू होती. मात्र त्यामध्ये प्रवाशांचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना बुधवारी शाळेतून सूचना न मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी शाळा गाठली. मात्र शाळेबाहेर बंदचा फलक पाहून पुन्हा माघारी फिरले. आयटी कंपन्यांमधील कामगार सकाळी आठपूर्वी कामावर जाताना दिसून आले. शहरातील सर्वच मंडईत बंद पाळण्यात आला. 

Pimpri chinchwad pune

पिंपरीतील वल्लभनगर एसटी आगारातून एकही बस पाठविण्यात आलेली नाही किंवा बाहेरगावाहून एकही बस आगारात आलेली नाही. बुधवारी रात्री आलेल्या बसही मुक्‍कामी ठेवण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. रावेत, भोसरी आणि हिंजवडी परिसरात मराठा तरुणांनी बाईक रॅली काढली. हिंजवडीमध्ये विप्रो चौकात रास्तारोको करण्यात आला. भोंडवे चौक, रावेत येथे मराठा तरुणांनी ठिय्या आंदोलन केले. भोसरीतही पीएमटी चौकात तरुणांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आकुर्डी प्राधिकरण परिसरातही दुचाकी रॅली काढण्यात आली. मावळ परिसरात एक्‍सप्रेस हायवेवरही वाहतूकीविना रस्ते ओस पडलेले पाहायला मिळाले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Maharashtra Bandh In Pimpri Chinchwad Pune