PNE19P81555.jpeg
PNE19P81555.jpeg

डल्लासमध्ये घुमला मराठी आवाज

पुणे : अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे 19 वे अधिवेशन नुकतेच डल्लास, टेक्‍सास स्टेट येथे दिमाखात पार पडले. बीएमएम या नावाने ओळखले जाणारे हे अधिवेशन दर दोन वर्षांनी जुलै महिन्यात होते. या सोहळ्यात प्रामुख्याने अमेरिका व कॅनडा येथील 3900 मराठीवासीयांनी हजेरी लावली होती. 

अधिवेशनाची सुरवात भारत, अमेरिका व कॅनडा या देशांच्या राष्ट्रगीतांनी झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचे व्याख्यान झाले. अडीच दिवसांच्या या आनंदयात्रेला विविधढंगी भरगच्च कार्यक्रम होते. नाट्य, नृत्य, संगीत, गायन, आहार, अध्यात्म, विनोद अशा विविध विषयांवरील कार्यक्रमांची रेलचेल होती. सारेगम, ढोल ताशा, शास्त्रीय गायन अशा स्पर्धा होत्या. विठ्ठल रखुमाईचे सुंदर मंदिर, शिवछत्रपतींचा पुतळा, प्रत्येक टेबलवर आकाशकंदील, पतंग किंवा गुढी अशा सजावटीमुळे जणू मराठी नात्यांचा उत्सव साजरा होत आहे, असेच वाटले. सुबोध भावे, अशोक पत्की, संजय मोने, विजय कोपरकर, देवकी पंडित, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, मकरंद अनासपुरे, स्पृहा जोशी, डॉ. जगन्नाथ दीक्षित अशा नामवंतांची मांदियाळी या आनंदयात्रेत अनुभवता आली. 

कार्यक्रमाची सांगता हृषीकेश जोशींनी लिहिलेल्या "भेटीत गुप्तता मोठी' या खुमासदार कार्यक्रमाने झाली. कुठेही गोंधळ नाही, जेवणासाठी रांगा नाही की एखादा पदार्थ संपला असे कधी झाले नाही. अळूची पातळ भाजी, उकडीचे मोदक, श्रीखंड, जिलबी तसेच वरण-भात-तूप इत्यादी अस्सल मराठी पदार्थ जेवणात होते. त्यात भर म्हणून पहिल्या दिवशी आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची थाळी होती. इतक्‍या मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक आल्यामुळे जवळ असलेल्या चांगल्या हॉटेलमध्ये त्यांची उत्तम सोय करण्यात आली होती. 

दिलीप राणे यांच्या नेतृत्वाखाली डॅलस महाराष्ट्र मंडळाचे सुमारे 300 कार्यकर्ते गेले काही महिने अथक परिश्रम घेत होते. पुढील अधिवेशन शार्लेट येथे जुलै 2021 मध्ये होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com