नदीप्रदूषण उद्योगांना भोवले 

सुधीर साबळे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पिंपरी - औद्योगिक कंपन्यांकडून रसायनयुक्‍त पाणी नदीमध्ये सोडण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दीड महिन्यात शहरातील 21 कंपन्यांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला आहे. 

शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांमध्ये काही उद्योगांकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. त्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कंपन्यांची पाहणी करून त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. दोषी कंपन्यांवर कारवाई करण्यात आली. या उद्योगांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासंदर्भात महापालिकेला लेखी कळविले आहे. 

राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश  
कंपन्यांकडून नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी संयुक्‍तपणे पाहणी केली व दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोघांनी शहरातील विविध भागांचे सर्वेक्षण केले. 

शहरातील या भागात सर्वेक्षण 
भोसरी, पिंपरी, चिंचवड, चिखली, कुदळवाडी, मोशी, जाधववाडी, तळवडेत अनेक लघुउद्योग आहेत. उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते सोडणे अपेक्षित असते. मात्र अनेक जण प्रदूषित पाणी नदीत सोडतात. त्यामुळे नदी आणि नाल्यातील प्रदूषणात मोठी वाढ होते. 

15 टक्‍के सांडपाणी थेट नदीत 
पिंपरी-चिंचवड परिसरातून थेट 15 टक्‍के सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याची गंभीर दखल घेतली आहे. नदीत जाणारे सांडपाणी थांबवण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र दखल घेतली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून महापालिकेवर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

दर तीन महिन्यांनी तपासणी 
पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांना जोडणाऱ्या नाल्यांमधून येणाऱ्या पाण्याची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्यात येणार आहे. नदीमध्ये मिसळले जाणाऱ्या पाण्यात किती प्रदूषण होत आहे, याचा तपशीलवार आढावा घेण्यात येणार आहे. 

नदी, नाल्यांमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांचा शोध घेण्याची मोहीम चार महिने सुरूच राहणार आहे. कंपन्यांनी पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा बसवणे आवश्‍यक आहे. नदी, नाल्यांमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
-डॉ. हेरंबप्रसाद गंधे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे विभाग. 

आकडे बोलतात 

दीड महिन्यात तपासलेल्या कंपन्या- 45 
पाणी, वीज खंडित केलेल्या कंपन्या- 21 

Web Title: Maharashtra Pollution Control Board has blocked water and electricity supply of 21 companies due to water pollution