मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

पुणे - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वर्दा चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार असून, त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली आहे. या वादळामुळे थंडीची तीव्रताही कमी होईल, असेही खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या वर्दा या चक्रीवादळाचा प्रवास वेगाने आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या दिशेने सुरू आहे. पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात अंदमान आणि नोकाबर बेटांच्या जवळ गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचे रूपांतर गुरुवारी चक्रीवादळात झाले. हे वादळ 55 किलोमीटर प्रतितास या वेगाने पुढे सरकत आहे. पुढील बारा तासांमध्ये याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याचा धोका आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढेल. या चक्रीवादळाचा प्रवास आत्ता वायव्येकडे सुरू आहे. आंध्र प्रदेशमधील नेल्लोर आणि मच्छलीपट्टण यादरम्यान 12 डिसेंबरला हे वादळ पूर्व किनारपट्टीला धडकेल. त्या वेळी या भागात जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

या चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणात होणार आहे. नाडा या चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्यात राज्यात अंशतः ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे राज्यात सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त झाला होता.

त्यानंतर आठवडाभरातच आलेल्या या वादळामुळे राज्यातील थंडीची तीव्रता परत कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात सध्या जाणवणारी थंडी पुढील दोन दिवसांमध्ये कमी होईल. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: maharashtra, Vidarbha Chance of Rain