आंबेगाव : आंबेगावात गाजावाजा दिलीपराव एकच राजा’ : | Election Results 2019

विवेक शिंदे
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा विजय निश्चित झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी ‘आंबेगावात गाजावाजा दिलीपराव एकच राजा’ या गीतावर अक्षरशः ठेका धरुन जल्लोष साजरा केला.

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव विधानसभा मतदार संघात फेरीनिहाय निकाल जाहीर होताना क्षणाक्षणाला ताणली जाणारी उत्कंठा कार्यकर्त्यांमध्ये पहावयास मिळत होती. उत्साह, आनंद आणि निराशा अशा संमिश्र भावनांचे दर्शन घडत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा विजय निश्चित झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी ‘आंबेगावात गाजावाजा दिलीपराव एकच राजा’ या गीतावर अक्षरशः ठेका धरुन जल्लोष साजरा केला.

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आंबेगाव विधानसभा मतदार संघाचा निकाल ऐकण्यासाठी सकाळी सात नंतर आंबेगाव व शिरूर तालुक्यातून अनेक कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. निकाल कधी लागतो ? याची अनेकांना उत्कंठा होती. मतमोजणीची आकडेवारी समजल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पहावयास मिळाली. निकाल जसजसे जाहीर होत होते, तसे वातावरण बदलत होते. पहिल्या फेरीपासून वळसे पाटील आघाडीवर होते. निकालाची आकडेवारी जाहीर होताच कार्यकर्त्याचा आनंद वाढतच होता. दिलीप वळसे पाटील यांनी सलग सातव्यांदा विजयाची सप्तपदी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यात लढत झाली. 12 फेरी अखेर 27 हजार 200 मतांनी दिलीप वळसे पाटील आघाडीवर असल्याचे समजतात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दिलीप वळसे पाटील, शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.‘आंबेगावात गाजावाजा दिलीपराव एकच राजा’ हे गाणे लावल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Ambegav trends early morning