जुन्नर : शेरकर, काळे यांच्या साथीने बेनके यांचा विजय | Election Results 2019

junnar
junnar

जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांचा विजय हा खऱ्या अर्थाने बेनके, शेरकर, काळे यांच्या आघाडीचा विजय मानला जात आहे. विद्यमान आमदारांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी त्यांचे नेतृत्व नाकारले असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. आशा बुचके यांच्या उमेदवारीचा अप्रत्यक्ष लाभ हा बेनके यांना मिळाला आहे.

शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून आशा बुचके यांची ओळख होती. मागील सलग दोन निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तिसऱ्यांदा त्या शिवसेनेकडून इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदारांनी मनसेतून शिवसेनेत उडी घेतली. लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. यामुळे तालुक्यात शिवसेनेत निष्ठावान व नवसैनिक अशी दरी पडली. बुचके समर्थक निष्ठावान शिवसैनिकानी प्रत्यक्ष प्रचारात भाग घेऊन बुचके यांना मदत केली. शिवसेनेतील मतविभाजनाचा फटका बसल्याने तालुक्याचे नेतृत्व पराभूत झाले असल्याचे मतमोजणी नंतर स्पष्ट झाले आहे.

सन 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे वल्लभ बेनके व विद्यमान आमदारांकडून बुचके पराभूत झाल्या होत्या.या वेळी मी आमदार होणारच या ईर्षेने त्यांनी प्रचार केला होता. सलग तिसऱ्या पराभवामुळे त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

मतभेद बाजूला ठेवल्याचा लाभ 
विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी बेनके यांच्याशी असलेले राजकीय मतभेद बाजूला ठेवत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार बेनके यांना मदत करत लोकसभेप्रमाणे यावेळीही आघाडीचा धर्म पाळालाआणि बेनके यांचा विजय सुकर झाला.

तिरंगी लढत 
जुन्नरला एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र खरी लढत अतुल बेनके, विद्यमान आमदार, व आशा बुचके यांच्या झाली. जुन्नर विधानसभा मतदारसंघात 67.33 टक्के मतदान झाले होते. एकूण 2 लाख 99 हजार 648 मतदारापैकी 2 लाख 01 हजार 764 मतदारांनी 356 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यात 1 लाख 08 हजार 043 पुरुष व 93 हजार 721 महिला मतदारांचा समावेश होता.

शरद पवार यांच्या सभेचा परिणाम 
अतुल बेनके यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी स्वतः शरद पवार यांनी जुन्नरला प्रचाराची सभा घेतली. यावेळी मोठी गर्दी होती.याबरोबर खासदार डॉ.अमोल कोल्हे, अजित पवार, जयंत पाटील, अमोल मिटकरी यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर विरोधकांना सभेसाठी मजुरीने माणसे आणण्याची पाळी आली होती.पवारांच्या सभेचा प्रभाव अखेरपर्यत मतदारांवर अखेरपर्यंत कायम राहिला. 

मनसे व मार्क्सवादी पक्षाची मदत
अतुल बेनके यांना अखेरच्या टप्प्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व मनसे या दोन राजकीय पक्षांनी दिलेला पाठींबा देखील महत्वाचा ठरला आहे. केवळ पाठींबा न देता मनसेचे मकरंद पाटे व त्याचे कार्यकर्ते बेनके यांचे प्रचारात सक्रिय राहिले.

मतदारांनी तालुक्याची प्रथा डावलली 
जुन्नरमध्ये यापूर्वी आमदार बाळासाहेब दांगट व वल्लभ बेनके यांना सलग दोन दोन वेळा मतदारांनी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. यावेळी मात्र विद्यमान आमदारांना मतदारांनी पहिल्या टर्म मध्येच घरचा रस्ता दाखविल्याने यावेळी ही प्रथा मोडली असल्याची चर्चा होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com