भोसरी : आमचा नेता लई पॉवरफुल्ल | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

'तो पत्ता करतो गूल..पॉवरफुल्ल..आमचा नेता लई पॉवरफुल्ल' यासारख्या गाण्यांवर भोसरीचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. बालेवाडी स्टेडियमबाहेर लांडगे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत आणि भंडारा उधळत आनंदोत्सव साजरा केला. 

पिंपरी (पुणे) : 'तो पत्ता करतो गूल..पॉवरफुल्ल..आमचा नेता लई पॉवरफुल्ल' यासारख्या गाण्यांवर भोसरीचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. बालेवाडी स्टेडियमबाहेर लांडगे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत आणि भंडारा उधळत आनंदोत्सव साजरा केला. 

भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत माजी आमदार विलास लांडे यांच्यातच मुख्य लढत होणार हे स्पष्ट होते. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये लांडे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यावेळच्या चुका दुरुस्त करून लांडे कपबशीच्या चिन्हावर विजय मिळवून त्याची परतफेड करणार काय? अशी उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे, बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. 

क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच लांडगे यांनी आघाडी घेण्यास सुरवात केली. पहिल्यापासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. जेव्हा विजय समीप आला तेव्हा लांडगे आपल्या समर्थकांसह बालेवाडी स्टेडियम येथे दाखल झाले. तत्पूर्वीच, कार्यकर्ते स्टेडियमजवळ गाड्यांमधून जमा होण्यास सुरवात झाली. लांडगे यांना मोठे मताधिक्‍य मिळत असल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. कार्यकर्त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत भंडारा उधळला. त्यामुळे स्टेडियम बाहेरच्या ऑर्चिड हॉटेल येथील चौक पिवळा झाला होता. याठिकाणी जेव्हा लांडगे आले. तेव्हा, समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. लांडगे यांनीही हात उंचावत त्यांना अभिवादन केले. 

पैलवानाने थोपटले दंड... 
निवडणूक प्रचारात लांडगे-लांडे यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. एकमेकांवर जोरदार टीकेचे प्रहार झाले होते. त्यामुळे विजयोत्सव चालू असताना लांडगे यांनी दंड थोपटत विरोधकांना सूचक इशारा दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election pune bhosari final result bjp mahesh landage won