पिंपरीमध्ये भंडाऱ्याची उधळण | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा विजय जाहीर झाल्यानंतर पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विविध भागांत कार्यकर्त्यांनी भंडारा उधळत फटाके फोडून आनंद व्यक्‍त केला.

पिंपरी (पुणे) : विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा विजय जाहीर झाल्यानंतर पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विविध भागांत कार्यकर्त्यांनी भंडारा उधळत फटाके फोडून आनंद व्यक्‍त केला.

विजयाची चाहूल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करायला सुरवात केली. दुचाकीवरून येणारे कार्यकर्ते राष्ट्रवादी झिंदाबाद, अशा घोषणा देत होते. दरम्यान, मतदानाच्या दिवशी पिंपरीत झालेल्या हाणामारीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी कॅम्प, बाजारपेठ आदी परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. 

झोपडपट्ट्यांत आनंदोत्सव 
बनसोडे यांचा विजय निश्‍चित झाल्यानंतर मतदारसंघातील झोपडपट्‌टी परिसरातील नागरिकांनी भंडाऱ्याची उधळण केली. पिंपरीगाव, भाटनगर, आनंदनगर आदी भागांतील कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यामुळे पिंपरी मतदारसंघातील पक्ष कार्यालयात शुकशुकाट होता. दरम्यान, राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. 

मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी अन्‌ पावसाची हजेरी 
बालेवाडीतील मतमोजणी केंद्राबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून गर्दी केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी जल्लोष केला. दुपारनंतर शहरात पावसाला सुरवात झाली. मात्र पावसाला न जुमानता दुचाकीवरून फिरत कार्यकर्ते आनंद साजरा करतानाचे चित्र अनेक भागांमध्ये पाहायला मिळाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election pune pimpri final result ncp anna bansode won