कोथरूड : चंद्रकांत पाटलांची आघाडी घटली; मनसेची टफ फाईट | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुण्यातल्या हाय व्हॉल्टेज अशा समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत.

पुणे : पुण्यातल्या हाय व्हॉल्टेज अशा समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. पण दुपारच्या टप्प्यात त्यांची आघाडी कमी झालेली असून केवळ 3900 मतांच्या आघाडीवर त्यांना समाधान मानावे लागत आहे. पाटलांनी 48 हजार 876 मतं मिळाली असून मनसेच्या किशोर शिंदेंना 44 हजार 893 मतं मिळाली आहेत. या फेरीअखेर पाटलांचे मताधिक्य 3900 इतके आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्व प्रमुख विरोधी पक्षांनीही या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे, भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019

चंद्रकांत पाटील हे पुण्याबाहेरील उमेदवार असल्याची टीका झाली. या भागातून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिंदे स्थानिक उमेदवार असल्याचा प्रचार विरोधी पक्षांनी केला. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी कोथरूड गावात सभा घेऊन प्रचारात रंग भरला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पुण्यात झाली. मोदी यांची सभा मुख्यत्वे पाटील यांच्यासाठी झाली. पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाची केंद्राची व राज्याची यंत्रणाही कामाला लागली होती. शहरातील भाजपची सर्व यंत्रणा या भागात दिवसरात्र प्रचारात होती. पाटील यांच्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता. तरीदेखील सर्व विरोधी पक्षांनी एकच उमेदवार दिल्याने, तसेच शहरातील प्रचारातही पाटील यांना लक्ष्य केल्याने, प्रचाराच्या ऐन धामधुमीच्या काळात पाटील यांना अनेक दिवस या मतदारसंघात अडकून पडावे लागले. 

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019

कोथरूड मतदारसंघ हा पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता. पूर्वीचा शिवाजीनगर व 2009 नंतर झालेला कोथरूड मतदारसंघात 1980 पासून भाजप-शिवसेना युतीचेच उमेदवार निवडून येत आहेत. यापूर्वी खासदार अण्णा जोशी, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, शिवसेनेचे विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 result Kothrud trends morning