Vidhan Sabha 2019 : ...मग मोदी-शहांच्या सभा का घेता?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

‘आमच्यासमोर विरोधकच कोणी दिसत नाहीत. मग लढायचे कोणाशी, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. असे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा का घेता,’’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उपस्थित केला.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमच्यासमोर विरोधकच कोणी दिसत नाहीत. मग लढायचे कोणाशी, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. असे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा का घेता,’’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उपस्थित केला.

आकुर्डीतील खंडोबा कार्यालयात आयोजित शहरातील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘भाजप हा बोलघेवड्यांचा पक्ष आहे. परदेशातून काळा पैसा आणू, शेतकऱ्यांची कर्जे माफ करू, अशी केवळ घोषणाबाजी भाजपने केली. मात्र, प्रत्यक्षात जीएसटी व नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. लोकांना हे सारे दिसते आहे; म्हणूनच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

आमच्या काळात सामान्य कार्यकर्त्यांना पदे दिली, आमदार केले. गेल्या वेळच्या निवडणुकीत आमचा अतिआत्मविश्‍वास नडला आणि पिंपरीत पराभूत झालो. आता तो गहाळपणा करणार नाही. समोरचे तुल्यबळ आहेत, या भावनेनेच प्रचार करणार आहे.’’ 

पवार म्हणाले, ‘‘आताची निवडणूक ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. त्यामुळे ३७० चा मुद्दा सांगू नका. राज्यात काय केले ते सांगा. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, राज्याला कर्जबाजारी केले आहे. २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्‍लीन चिट दिली आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे औद्योगिक मंदीचे सावट आहे. 

विकासदर घटला आहे. भाजपने मित्रपक्षांनाही फसविले आहे. लोकांत नाराजी आहे. शास्तीकर, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व रिंग रोड विषयावर लोकांनी निदर्शने केली. भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 ajit pawar talking politics