Vidhan Sabha 2019 : भोसरी : विलास लांडे राजकीय वस्ताद - पवळे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

‘विलास लांडे हे राजकीय वस्ताद आहेत. त्यांनी दहा वर्षे आमदार म्हणून विकासाचेच राजकारण केले. सूडाचे नव्हे,’’ असे प्रतिपादन स्थायी समितीच्या माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे यांनी केले.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘विलास लांडे हे राजकीय वस्ताद आहेत. त्यांनी दहा वर्षे आमदार म्हणून विकासाचेच राजकारण केले. सूडाचे नव्हे,’’ असे प्रतिपादन स्थायी समितीच्या माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे यांनी केले. 

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी मंगळवारी (ता. १५) निगडीतील साईनाथनगर, यमुनानगर परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. सर्वप्रथम त्यांनी पवळे यांच्या घरी जाऊन कुटुंबातील ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतले. या वेळी त्या बोलत होत्या. पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह भाजप आणि शिवसेनेतील नाराजांनीही सहभाग घेतला.

चौकाचौकात महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
पवळे म्हणाल्या, ‘‘लांडे हे सामान्यांचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना सर्वच पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. मतदारसंघातील कारभारावर आणि दादागिरीला वैतागलेल्या सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचेसुद्धा लांडे यांना पाठबळ मिळालेले आहे. सर्वपक्षीयांच्या पाठिंब्याने लढणारे लांडे हे मतदारसंघातील जनतेच्याही पसंतीचे उमेदवार आहेत. मिळणारा प्रतिसाद पाहता विजय झाल्यातच जमा आहे. यमुनानगर आणि परिसरातून लांडे यांना मताधिक्‍य मिळेल यात शंका नाही.  निगडी परिसर हा नेहमी चांगल्या विचारांच्या मागे उभा राहणारा परिसर आहे. लांडे यांनी आमदार असताना त्यांनी या भागातील अनेक सोसायट्यांचा विकास, रस्ते विकास, उद्याने तसेच मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी काम केले आहे.’’ 

निगडी गावठाणातील मारुती मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. त्यामध्ये मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेवक शशिकिरण गवळी, बीआरएसपीचे शहराध्यक्ष संजीवन कांबळे, बाळासाहेब वेदळेकर, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 bhosari constituency vilas lande suman pawale politics