Vidhan Sabha 2019 : ‘बूथ ॲप’मुळे पटणार मतदारांची ओळख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

अशी असेल प्रक्रिया
कसबा मतदारसंघातील मतदारांना गुगल प्लेस्टोअरमधून ‘बूथ ॲप’ डाउनलोड करावे लागणार आहे. यामध्ये ईव्हीपी नावाचा एक टॅब आहे. यामध्ये मतदाराला त्याचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यावर संबंधितांना एक ओटीपी क्रमांक मिळेल. हा ओटीपी टाकल्यानंतर त्यांना एक ‘क्‍यूआर कोड’ मिळणार आहे. हा ‘क्‍यूआर कोड’ संबंधित मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दाखवायचा आहे. हा अधिकारी कोड स्कॅन करून घेणार आहे. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रांशिवाय मतदाराला मतदानाची संधी मिळणार आहे.

विधानसभा 2019 : पुणे - निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यादांच ‘क्‍यूआर कोड’च्या माध्यमातून मतदारांची ओळख पटविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी ‘बूथ ॲप’ हे नवीन ॲप तयार करण्यात आले आहे. मतदारांना या ॲपच्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे.

राज्यात प्रायोगिक तत्त्वावर कसबा विधानसभा मतदारसंघात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘मतदान केंद्रामध्ये अधिकारी मतदाराची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्राची मागणी करतात. ओळखपत्र दाखविल्यानंतर त्याची नोंद पुस्तिकेमध्ये करण्यात येते. प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र तपासून त्याची नोंद घेण्यासाठी वेळ लागतो. यामुळे मतदान केंद्रांवर रांगा लागत असल्याने मतदारांना ताटकळत उभे रहावे लागते. यापासून मतदारांची सुटका व्हावी, विनाअडथळा मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने हे ॲप तयार केले आहे. कोणत्या बूथवर किती मतदान झाले, याची आकडेवारीही उपलब्ध होणार आहे.’

ज्यांच्याकडे ‘क्‍यूआर कोड’ नसेल, अशा मतदारांना त्यांची कागदपत्रे पाहून त्यांना मतदानाची संधी देण्यात येईल.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Boorth App Voter Identity