Vidhan Sabha 2019 : उमेदवारांचा रविवार पाण्यात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

उमेदवारांकडून नियोजनावर भर
या निवडणुकीसाठी २१ ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघा १५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रचारासाठी एकच रविवार मिळणार आहे. एवढ्या कमी कालावधीत मतदारसंघांतील प्रत्येक मतदारांपर्यंत उमेदवारांना पोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यावर उमेदवारांचा भर आहे; तसेच बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आज दिवसभर प्रयत्न सुरू होते.

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच रविवारी दुपारी शहरात जोरदार पाऊस झाल्याने उमेदवारांनी केलेल्या प्रचाराच्या नियोजनावर पाणी फिरले. एकीकडे बंडखोरांची मनधरणी; तर दुसरीकडे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन, गाठीभेटी आणि पदयात्रा... अशा धावपळीत उमेदवारांचा रविवारचा दिवस गेला. 

गेल्या आठवड्यात उमेदवारी मिळविण्याची गडबड सुरू होती. अर्ज भरल्यानंतर प्रचारासाठी मिळालेला आज पहिलाच रविवार होता. त्यातच प्रत्येक मतदारसंघात आणि पक्षांत बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (ता. ७) आहे. त्यामुळे एकीकडे बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे रविवारचे निमित्त साधत पदयात्रा आणि गाठीभेटींचे नियोजन उमेदवारांकडून करण्यात आले होते; परंतु दुपारी शहरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक उमेदवारांचे प्रचाराचे नियोजन कोलमडले. ऐनवेळी नियोजनात बदल करीत काही उमेदवारांनी गाठीभेटींवर भर दिला; तर काहींनी सकाळीच पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. सायंकाळी बैठका आणि मेळव्यांचे आयोजन करण्यात आले होते. काही उमेदवारांनी रविवारचे निमित्त साधत निवडणूक संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Candidate Promotion Rain Water