Vidhan Sabha 2019 : आचारसंहितेचेही ‘सीमोल्लंघन’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

शहरामध्ये प्रमुख ठिकाणी तपासणी नाकी उघडण्यात आली आहेत. गुंडगिरी प्रतिबंधात्मक पथके (गुंडा स्क्वाॅड)ही कार्यरत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अतिवेगाने बेदरकारपणे गाडी चालविणे, ट्रिपल सीट, असभ्य वर्तणूक यांसारख्या प्रकारांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.
- सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, वाहतूक

विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून प्रचार फेऱ्यांपर्यंतच्या काळात वाहनांचा अमर्यादित वापर होत असून, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे आचारसंहितेची ‘ऐशीतैशी’ झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भातील तक्रारींसाठी ‘सी-व्हिजिल ॲप’ उपलब्ध केले आहे. त्या ॲपवर नागरिकांनी झेंडे, बॅनर यासंदर्भातील तक्रारी आतापर्यंत नोंदविल्या आहेत. मात्र, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहन फेऱ्यांमधून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना शहरातील तिन्ही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांनी कारवाईचा चेंडू वाहतूक पोलिसांकडे टोलविला आहे.   

भोसरी विधानसभा निवडणूक कार्यालयाचे आचारसंहिता कक्षप्रमुख औदुंबर पाटील म्हणाले, ‘‘सी-व्हिजील ॲपवर आतापर्यंत आठ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या झेंडे, बॅनर याबाबतच्या असून, त्यावर कारवाई झाली आहे.

सध्या आचारसंहिता भंगाचा कोणताही गुन्हा दाखल नाही. उमेदवाराला वाहन फेरीसाठी २४ तासांच्या आत परवानगी दिली जाते. प्रचारात किती वाहने असावी? यावर बंधन नाही. मात्र, कमाल दहा वाहनांची परवानगी आहे. तसेच त्या उमेदवाराच्या शंभर मीटरचे अंतर ठेवून कितीही वाहने प्रचारात ठेवण्यास मुभा आहे. परंतु जास्त वाहने दिसल्यास आमचे व्हिडिओ पथक त्याचे चित्रीकरण करीत असून, त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात दाखल केला जातो.’’

पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल म्हणाल्या, ‘‘उमेदवाराला वाहनांसाठी परवानगी दिली जाते. मात्र, वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहने टप्प्याटप्प्याने गेली पाहिजेत. माझ्याकडे वाहन फेऱ्यांसाठी उमेदवारांनी परवानगी घेतली आहे. दुचाकी, तीनचाकी वाहनांमध्ये जादा समर्थक बसवून प्रचार करणे, किंवा विनाहेल्मेट गाडी चालविणे यांसारखे विषय आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या अख्यारित येतात. त्यासंदर्भातील कारवाई त्यांनी करायची आहे.’’

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आचारसंहिता कक्ष प्रमुख सतीश इंगळे म्हणाले, ‘‘आमच्याकडे आचारसंहिताभंगाच्या गंभीर तक्रारी नाहीत. त्यामुळे गुन्हेदेखील दाखल नाहीत. केवळ फलकासंदर्भात दोन तक्रारी सी-व्हिजिल ॲपवर नोंदविण्यात आल्या होत्या. वाहन प्रचार फेऱ्यांसाठी उमेदवारांनी परवानघ्या घेतल्या असून, वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांकडे आहेत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 code of conduct vehicle