Vidhan Sabha 2019 : ‘इलेक्‍शन वॉर’मध्ये सोशल मीडिया ‘स्वार’

Social-Media
Social-Media

विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे पाच दिवस उरले असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावरही उमेदवारांच्या पदयात्रा, राजकीय सभा, मतदारांना दिलेली आश्‍वासने यासह विरोधकांच्या टीकेला देण्यात आलेली उत्तरे याचे व्हिडिओ व्हायरल होत असून, या माध्यमातून ‘इलेक्‍शन वॉर’ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

उमेदवाराच्या समर्थकांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. उमेदवाराच्या रोजच्या प्रचार दौऱ्याच्या नियोजन कार्यकर्त्यांसह मतदारांपर्यंत पोचविले जात आहे. यासह सभेतील भाषणे, ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून झालेले स्वागत याबाबतची माहितीही अपलोड केली जात आहे. मराठी, हिंदी चित्रपटांतील गाण्यांसह उमेदवाराचे छायाचित्र व व्हिडिओ एकत्र करून गाणे तयार केले जात आहे. या माध्यमातून समोरच्या उमेदवाराला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेगवेगळ्या इमेज तयार करून त्यावर डायलॉग टाकून सोशल मीडियावर प्रसारित केले जात असून, आपलाच उमेदवार कसा वरचढ आहे, हे दाखवून दिले जात आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी जणू उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे. 

मावळ विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने पदावर असताना श्री क्षेत्र देहूगाव येथे केलेल्या कामांची यादी खर्चासह प्रसारित केली. त्यावर ही कामे कुठे आणि कधी केली हे तपशीलवार सांगावे, ही कामे तुमच्या कार्यकालात झालेलीच नाहीत, अशा प्रतिक्रिया विरोधी उमेदवाराच्या समर्थकांनी नोंदविल्या. विरोधी उमेदवाराने पदावर नसतानाही मागील तीन वर्षांत केलेल्या कामांची यादी प्रसारित केली. तळेगावात झालेल्या सभेतील भाषणात एका नेत्याने त्यांच्या उमेदवाराचे केलेले कौतुक व विरोधी उमेदवाराची वेगळ्या शैलीत उडविलेली खिल्ली याचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातही एका उमेदवाराला विविध राजकीय पक्षांसह संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल असताना विरोधी उमेदवारासह त्यांच्या समर्थकांकडूनही ‘शेर आखिर शेर होता है’ अशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.

सोशल मीडियासाठी स्वतंत्र विभाग तयार केला असून, ७५ जणांची टीम चोवीस तास काम करीत आहे. प्रचार फेरी, सभा, केलेली विकासकामे आदींचे फोटो, व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले जातात. विरोधी उमेदवाराच्या पोस्ट कडे लक्ष न देता आमचा उमेदवार व त्यांनी केलेले काम अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही कार्यरत असतो.
- प्रसाद कुलकर्णी, एका उमेदवाराच्या सोशल मीडिया विभाग प्रमुख

सोशल मीडिया हे नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी चांगले माध्यम आहे. मात्र त्याचा सर्व जण चांगला उपयोग करतातच असे नाही, निवडणुका काही दिवसांसाठीच असतात. मात्र काही पोस्ट अशा असतात, ज्यातून राजकारण्यांना फायदा होऊ शकतो. मात्र समाजासाठी त्या हानिकारक ठरू शकतात. प्रचारासाठीच्या शंभरपैकी नव्वद टक्के पोस्ट प्रक्षोभक व वाद निर्माण होण्यासारख्या असतात. याचा युवा शक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावर निवडणूक आयोगाने नियंत्रण ठेवायला हवे.
- साहिल घुले, सामान्य नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com