Vidhan Sabha 2019 : कोथरूड : कोथरूड बनविणार विकासाचे मॉडेल - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

संवेदनशील विषयांवर चर्चेतून तोडगा 
राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले, की कोणत्याही संवेदनशील विषयाबाबत विचार काय आहेत, मानसिकता काय आहे, याचा विचार करून चर्चा करून तोडगा काढला जाऊ शकतो. अशा विषयात घाईघाईने निर्णय घ्यायची गरज नाही.

विधानसभा 2019 : पुणे - कोथरूडमधील वाहतूक कोंडी, पाणी, सहा मीटर रस्त्यावरील इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन यांसह सर्व प्रश्‍न सोडविणार आहे. समृद्ध, आनंदी कोथरूड करण्यासाठी ही वाटचाल असून, राज्यातील विकासाचे सर्वोत्तम मॉडेल करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्‍वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दिले असून, ‘आय लव्ह कोथरूड’चा संदेशही दिला आहे. 

पुढील पाच वर्षांत कोथरूडसाठी काय करणार याचा चंद्रकांत पाटील यांनी ‘संकल्पनामा’ पत्रकार परिषदेत जाहीर केला. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, की पालकमंत्री म्हणून काम करताना पुण्यातील प्रश्‍नांचा अभ्यास झाला. शहर व कोथरूडचे प्रश्‍न कमी अधिक सारखेच आहेत. पुढील पाच वर्षे काम करताना नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन या संकल्पनाम्यात नवीन गोष्टीही समाविष्ट केल्या जातील. वीज यंत्रणा सुधारणे, मेट्रो मार्गाचे काम लवकर पूर्ण करून मेट्रो स्टेशन व इतर भाग ‘ई-बस’ने जोडला जाईल. ज्येष्ठांसाठी सर्व सुविधांनी युक्‍त अत्याधुनिक विरंगुळा केंद्र उभारले जाईल. 

कोथरूडमध्ये जागतिक दर्जाचे नाट्यमंदिर, ग. दि. माडगुळकर यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘गदिमा भवन’ उभे करणार आहे. सहा पादचारी मार्गांवरील अतिक्रमणे हटवून नागरिकांना सुविधा देणार, विकास आराखड्याची १०० टक्के अंमलबजावणी करून नियोजित विकास करणार, शिवसृष्टी प्रकल्प, बीडीपी, पानशेत पूरग्रस्त, आरोग्याचेही प्रश्‍नही मार्गी लावणार आहे, असे पाटील सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Kothrud Development Chandrakant Patil Politics