Vidhan Sabha 2019 : सभांसाठी जागा मिळेल का जागा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सभांसाठी जागा निश्‍चित करा : नांदगावकर
विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना प्रचारासाठी सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्वत:च्या अधिकारात काही जागा निश्‍चित करून ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

विधानसभा 2019 : पुणे - राजकीय सभांसाठी मैदान न देण्याचा ठराव शाळांनी केला आहे. रस्त्यावर सभा घ्यायची म्हटले, तर पोलिस आणि महापालिका परवानगी देत नाहीत. यासह विविध अडथळे पार करून सभेसाठी एखादी जागा निश्‍चित केली, तर पाऊस पाठ सोडायला तयार नाही... अशी परिस्थिती सध्या शहरातील उमेदवारांची आणि राजकीय पक्षांची झाली आहे. त्यामुळे मतदारांशी संवाद साधण्यासाठी सभा घ्यायची कुठे, असा प्रश्‍न उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा नऊ दिवसांचा कालावधी राहिला आहे. देश आणि प्रदेश पातळीवरील स्टार प्रचारकांच्या तोफा शहरात धडाडणार आहेत. परंतु सभा घेण्यासाठी जागा कशी उपलब्ध करायची, असा प्रश्‍न उमेदवारांना पडला आहे. कमीत कमी कालावधित अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचायचे माध्यम सभा. परंतु शहरात सभेसाठी जागाच उपलब्ध होणे अवघड झाले आहे. त्यातच गेले काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. 

पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांसमोर अडथळ्यांची मोठी शर्यत उभी आहे. 
जिल्हा निवडणूक प्रशासनाने सभेची परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे. परंतु सभा कुठे घ्यावी, यांची ठिकाणे मात्र निश्‍चित केली नाहीत. अनेक शाळांनी आपली मैदाने उपलब्ध करून देण्यास नकार दिला आहे. शहरात महापालिकेची काही सभागृह आहेत. त्या ठिकाणी आचारसंहितेमुळे सभा घेता येत नाही. रस्त्यावर सभा घेण्यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळाली, तर वाहतुकीच्या नावाखाली पोलिसांकडून परवानगी नाकारली जात आहे. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर एक मैदान मिळाले. परंतु, पावसामुळे ही सभा होऊ शकली नाही. परिणामी सभेसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नरपतगीर चौकातील सभेबाबत देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती.

सभेला परवानगी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे. सभेची ठिकाणे आम्ही निश्‍चित करू शकत नाही. तसेच सभांसाठी खासगी शाळांना परवानगी देण्याचा आग्रह धरू शकत नाही. रस्त्यावर सभा घ्यावयाची असेल, तर पोलिस आणि महापालिकेची परवानगी बंधनकारक आहे.
- नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Leader Speech Place Issue