Vidhan Sabha 2019 : मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

शहर विकासाचा ‘रोड मॅप’ 

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बसची संख्या वाढवणे, रस्ते चांगल्या पद्धतीने करणे, वाहतूक दिव्यांचे सिंक्रोनायझेशन, मेट्रोच्या मार्गांचे विस्तारीकरण, दौंड- लोणावळा लोकल निर्माण करणे 
  • आठही विधानसभा मतदारसंघांत ससूनच्या धर्तीवर किफायतशीर दरातील आरोग्य सुविधा देणारी रुग्णालये निर्माण करणे 
  • झोपडपट्टीधारकांना पक्की घरे बांधून देणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची गती आणि संख्या वाढविणे 
  • नद्यांच्या स्वच्छतेबरोबरच काठांचे सुशोभीकरण, सर्व नाले अतिक्रमण मुक्त करणे 
  • कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना चालना देणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून ते पाणी शेतीसाठी वापरता येणारे प्रकल्प उभारणे 
  • विकास आराखड्याची वेगाने अंमलबजावणी करणे 
  • युवकांना कौशल्याचे प्रशिक्षण देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे 
  • महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण, बचत गटांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादनांना व्यासपीठ देणे

विधानसभा 2019 : पुणे - वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, सार्वजनिक वाहतुकीसाठी बसची खरेदी, पर्यावरणाच्या संतुलनासाठी उपाययोजना, झोपडपट्टीधारकांना पक्की घरे, नेटके नगर नियोजन आदी मुद्द्यांना प्राधान्यक्रम भाजप आणि शिवसेना महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी निश्‍चित केला आहे. 

भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘‘शहरातील मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण करणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नव्या बस घेण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. तसेच, विकास आराखड्याची अंमलबजावणी वेगाने करतानाच नगरनियोजनावर भर दिला जाईल. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पांना गती दिली जाईल. आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल.’’ 

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, ‘‘शहर, उपनगरांत आणि समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा, ‘एसआरए’ला गती देणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वंकष आराखड्याची अंमलबजावणी करणे, ससूनच्या धर्तीवर आठही मतदारसंघांत आरोग्य सुविधा देणारी रुग्णालये निर्मिती, चांगले रस्ते तयार करणे हा शिवसेनेचा प्राधान्यक्रम असेल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 metro Public transport priority yuti politics