Vidhansabha 2019 : मिशन इलेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अशा असतील सुविधा...
दोन किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असणार
पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर आणणार
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी व्हील चेअर
मतदारांना यादीत नावे शोधण्यासाठी ‘हेल्प डेस्क’
ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास २० मिनिटांत दुरुस्ती
मावळ, मुळशीत नेटवर्क अडचणीमुळे वायरलेस यंत्रणा 
दहा लाखांवरील आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागाची नजर

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी सुमारे ७० हजार अधिकारी-कर्मचारी तैनात असतील. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

राम म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनची कमतरता भासणार नाही. अतिरिक्‍त मशिनची मागणी करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्‍यक पावले उचलण्यात येत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत ‘पेड न्यूज’बाबत एकही प्रकरण आढळलेले नाही. यंदा एकाच टप्प्यात मतदान असल्यामुळे पोस्टल मतदान व्यवस्थित होईल, याकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे.’’ 

‘लोकसभा निवडणुकीत शहरातील ८९ मतदान केंद्रांवर आणि ग्रामीण भागात ९ मतदान केंद्रांवर ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदान झाले होते. शहरामध्ये वडगाव शेरी आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले होते. या ठिकाणी मतदार जागृतीसाठी प्रशासनाकडून ‘स्वीप’च्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिसांकडून शस्त्र परवानाधारकांना शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’’

या वेळी अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्‍त मितेश घट्टे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी उपस्थित होते.

शहर पोलिस आयुक्‍तालयाकडून तयारी 
पोलिस अधिकारी-कर्मचारी - ६ हजार
प्रतिबंधात्मक कारवाई - २ हजार ११५ 
एक्‍स, वाय आणि झेड दर्जाप्राप्त व्यक्‍तींनाच पोलिस संरक्षण

पुणे ग्रामीण पोलिसांची तयारी 
प्रतिबंधात्मक कारवाई ३ हजार ५००
गुन्हेगारांवर तडीपारीचे प्रस्ताव ५९
एमपीडीए कारवाईचे प्रस्ताव ४
नाकाबंदी, दारू आणि पैसे वाटपावर लक्ष

मतदार नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस
नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्‍टोबर असून, त्यापूर्वी दहा दिवस अगोदर म्हणजे २४ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. नावनोंदणी झाल्यास या नवमतदारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता येईल.

वयोगटनिहाय मतदारसंख्या
वयोगट               मतदार

१८ ते १९             १ लाख १३ हजार ६०६
२० ते २९             १३ लाख २६ हजार ५४०
३० ते ३९             १९ लाख ६६ हजार ८५२
४० ते ४९            १६ लाख ९९ हजार ९२१
५० ते ५९             ११ लाख ६१ हजार ५८२
६० ते ६९             ७ लाख ५१ हजार ५३०
७० ते ७९             ४ लाख २८ हजार १७१
८० पेक्षा अधिक    २ लाख ३८ हजार ४३४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Mission Election Preparation