
प्रचाराची उद्या सांगता
शनिवार (ता. १९) सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी उमेदवारांकडे काही तासांचा अवधी शिल्लक आहे. सभा, पदफेरी, दुचाकी रॅली यामाध्यमातून प्रचार करण्यावर भर दिला जात आहे.
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून सर्वत्रच रोड शो, सभांचा धडाका सुरू आहे. पुण्यासह ग्रामीण भागातही विविध राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी सभा, रोड शो झाले. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील प्रचाराकडे राष्ट्रीय नेत्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवर चांगला परिणाम होतो. तसेच कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारतो. यासाठी पुणे शहरासह ग्रामीण भागात पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसह स्टार प्रचारकांच्या सभांचा आणि रोड शोचा धडाका सुरू आहे. या भागात रोज एका नेत्याची सभा गाजत आहे.
मात्र, त्याउलट परिस्थिती पिंपरी-चिंचवड शहरात आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदार संघात महायुती, महाआघाडीसह इतर राष्ट्रीय पक्षाचे उमेदवारांच्या प्रचारासाठी अद्याप एकाही राष्ट्रीय नेत्याची सभा तसेच रोड शो झाला नाही.
शहरात केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आदींच्या सभा झाल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्या सभा झाल्या होत्या.
यापूर्वी भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी यांची सभा झाली होती. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर यांच्या सभा झाल्या. मावळात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, भाजपचे स्टार प्रचारक उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. शिरूर येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा रोड शो झाला.