Vidhan Sabha 2019 : पर्वती : थेट लढत; तरीही ताकद पणाला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

मतदार वाढले
या मतदारसंघात मतदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत १४ हजार ३२१ ने वाढली आहे. या मतदारसंघात एकूण ३ लाख ५४ हजार २९२ मतदार आहेत. ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या ८४ हजार ७९२ आहे. त्यामुळे या वयोगटातील मतदान निर्णायक ठरणार आहे.

विधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पर्वती विधानसभा मतदारसंघात आता भारतीय जनता पक्षाने बस्तान बसविले आहे. भाजपच्या विद्यमान आमदार आणि शहराध्यक्षा माधुरी मिसाळ या मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. मात्र गेल्या निवडणुकीत मिसाळ यांच्याविरोधात असलेले काही उमेदवार सध्या आघाडीत आहेत. त्यांची मूठ बांधली गेली, तर आघाडीच्या उमेदवार अश्‍विनी कदम यांची ताकद आणखी वाढणार आहे.

वंचित बहुजन आघाडी, आप, बहुजन समाज पक्ष, बहुजन मुक्ती पार्टीचा उमेदवार व अपक्षांसह एकूण ११ उमेदवार येथे नशीब आजमावत आहेत. बंडखोरी न झाल्याने येथे युती आणि आघाडीत थेट लढत होणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र, इतर पक्षदेखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्‍यता आहे. सप्टेंबरअखेरीस झालेल्या पावसामुळे धनकवडी, अरण्येश्वर, तावरे कॉलनी, शिवदर्शन, पर्वती आदी ठिकाणी नागरिकांना फटका बसला. ट्रेझर पार्क, के. के. मार्केट या मोठ्या सोसायट्यांनाही साठलेल्या पाण्याचा फटका बसून त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे या भागातील मतदारांमध्ये नाराजी असून, आंबिल ओढ्यातील अतिक्रमण व त्यातील कचरा हे मुद्दे चर्चेत आहेत. त्याचे पडसाद मतदानावर उमटण्याची शक्‍यता आहे.

मिसाळ शहराध्यक्षा असल्यामुळे त्यांना अन्य मतदारसंघाकडेही लक्ष द्यावे लागत आहे. मात्र, त्यांची यंत्रणा कार्यान्वित आहे. तर, कदम यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, असे असले तरी आघाडीतील इच्छुक अद्यापही नाराज असल्याचे दिसते. बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले व मागील निवडणूक लढविलेले आघाडीतील दोन नगरसेवक कदम यांच्या प्रचारात सहभाग घेत असल्याचे दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 parvati madhuri misal ashwini kadam politics