esakal | Vidhan Sabha 2019 : कॅंटोन्मेंट वार्तापत्र : उमेदवारांच्या गर्दीमुळे मतविभागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Voting

हक्काच्या मतदारांवर भर
दलित, मुस्लिम आदींबरोबरच येथे परराज्यातून येऊन येथे स्थायिक झालेल्या मतदारांची संख्या निर्णायक ठरू शकते. या ‘कॉस्मोपोलिटन’ मतदारसंघाचा इतिहास बघितला तर, येथे कोणालाच गृहीत धरता येत नाही. भाजपने बहुभाषिक लोकप्रतिनिधी येथे प्रचारात उतरविले आहेत; तर काँग्रेसने आपला हक्काचा मतदार टिकविण्यावर भर दिला आहे. कोरेगाव पार्कसारखा उच्चभ्रू भाग या मतदारसंघात असला तरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, कासेवाडी, राजेवाडी आदी भागातील मतदार कोणाच्या दिशेला झुकतात, यावरच विजयी उमेदवार ठरणार आहे.

Vidhan Sabha 2019 : कॅंटोन्मेंट वार्तापत्र : उमेदवारांच्या गर्दीमुळे मतविभागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - काँग्रेसने निर्माण केलेले आव्हान मोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमध्ये केलेल्या फोडाफोडीमुळे कॅंटोन्मेंट राखीव विधानसभा मतदारसंघातील चित्र बदलू लागले आहे. परिणामी, येथील लढत चुरशीची झाली असून, ‘एमआयएम’, वंचित बहुजन आघाडी, मनसे, बहुजन समाज पक्ष आणि ‘आप’च्या उमेदवारांमुळे होणाऱ्या मतविभागणीवर येथील निकाल अवलंबून असेल. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक २८ उमेदवार या मतदारसंघात आहेत.

 या मतदारसंघात दिलीप कांबळे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत पक्षाने त्यांच्याऐवजी त्यांचे धाकटे बंधू सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली. उमेदवार बदलल्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने सुरवातीला जोरदार वातावरण निर्मिती केली; परंतु शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनाच भाजपमध्ये आणण्यात कांबळे यांना यश आले. त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुधीर जानज्योतही कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे येथील लढतीत रंगत निर्माण झाली. त्यांच्याशिवाय या मतदारसंघातून ‘एमआयएम’च्या हीना मोमीन, ‘बसप’चे हुलगेश चलवादी, ‘मनसे’च्या मनीषा सरोदे, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे, ‘आप’चे खेमचंद सोनावणे यांच्यासह तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांच्या संख्येमुळे सुमारे दोन लाख ९२ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात मतविभागणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. काँग्रेसची परंपरागत व्होट बॅंक या मतदारसंघात आहे; परंतु गेल्या निवडणुकीपासून भाजपनेही येथे बस्तान बसविल्याने ‘व्होट बॅंक’मध्ये आणि जादा उमेदवारांमुळे मतविभागणीवरच निकाल अवलंबून असेल.