Vidhan Sabha 2019 : भरपावसातही तोफा धडाडणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

गडकरी, राजनाथ यांचीही सभा?
शहरातील तिन्ही मतदार संघातून युतीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पिंपरीतून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे, तर चिंचवड आणि भोसरीमधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे युतीच्या उमेदवारांसाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सभा होण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या युती, आघाडी आणि आघाडीपुरस्कृत अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. निवडणुकीसाठी आता अवघा आठवडा राहिला असून, पहिली सभा शुक्रवारी (ता. ११) पिंपरीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असेल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐन संध्याकाळी मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्याने मैदानांवर आयोजित केलेल्या सभा मंगल कार्यालयांमध्ये घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

शहरातून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या आघाडी आणि आघाडीपुरस्कृत अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभा घेण्याचे नियोजन केले 

आहे. आघाडीकडून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. शहरात काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत नसल्याने तूर्तास तरी काँग्रेसच्या नेत्यांच्या सभांचे नियोजन नाही.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा शुक्रवारी (ता. ११) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मैदानावर होणार आहे. शहरात पुढील आठवड्यात शिवसेनेच्या अन्य नेत्यांच्या सभा होण्याची शक्‍यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकरांच्या सभा पिंपरी, भोसरीमध्ये होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 rain leader speech politics