Vidhan Sabha 2019 : मतदान करा, टक्का वाढवा

Voting
Voting

विधानसभा 2019 : पिंपरी - शाळांच्या सत्रांत परीक्षा शनिवारी (ता. १९) संपत आहेत. त्यानंतर दिवाळीची दीर्घकालीन सुटी सुरू होत आहे. शिवाय, कामगारांना रविवारला (ता. २०) जोडून सुटी मिळाली आहे. त्यामुळे अनेकांनी भटकंतीला जाण्याचे, तर महिलांनी बच्चे कंपनीसह माहेरी जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २१) विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक विभाग व राजकीय पक्षासमोर आहे.

कोणत्याही निवडणुकीत मतदानाची कमी होणारी टक्केवारी नेहमीचा चिंतेचा विषय असतो. ती वाढविण्यासाठी राजकीय पक्षांसह निवडणूक विभाग विविध माध्यमांतून प्रबोधन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत मतदार जागृती मोहीम राबविली जात आहे. प्रभातफेरी काढली जात आहे. भित्तिपत्रके, पथनाट्याद्वारे प्रबोधन सुरू आहे. राज्य निवडणूक आयोग जाहिरातींच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करत आहे. 

याबाबत भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रेश्‍मा माळी म्हणाल्या, ‘‘मतदारांपर्यंत त्यांच्या ‘व्होटर स्लीप’ पोचविण्याचे काम सुरू आहे. मतदानाचे आवाहन करणारे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. इमारतींच्या तळमजल्यावरच मतदान केंद्र ठेवण्याचे नियोजन केले आहे. मतदारांच्या मदतीसाठी केंद्रांवर स्वयंसेवक नियुक्त करण्याचे नियोजन आहे. मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजवावा.’’

ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे शनिवारपासूनचे बुकिंग झाले आहे. बहुतांश कंपन्यांचे शनिवारी (ता. १९) व रविवारी (ता. २०) सुटणाऱ्या बस फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांची वाढती संख्या व दिवाळीची लगबग पाहून कंपन्यांनी प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. नियमित सहाशे रुपये असणारा तिकीट दर आठशे ते हजार रुपये झाला असल्याचे चिंचवडच्या एका एजंटाने सांगितले. 

दोन्हीकडे मतदान
काही जणांचे शहरातील मतदारसंघात आणि गावाकडच्या मतदार यादीतही नावे आहेत. असे बहुतांशजण गावाकडे मतदान करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे रविवारचे बुकिंग फुल्ल झाल्याचेही ट्रॅव्हल्स बुकिंग एजंटाने सांगितले. मात्र, गावी जातानाचे दोनपेक्षा अधिक तिकीट व परतीचे एकच तिकिटाचे काहींनी बुकिंग केले आहे. त्यामुळे पुरुष गावी जाऊन परत येणार आणि महिला व मुले दिवाळी सुटीसाठी गावीच थांबणार, असे त्यांचे नियोजन असल्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. 

मतदान करून जाणार
माझे पती बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना रविवारपासून सुटी आहे. मुलीच्या शाळेलाही सुटी आहे. त्यामुळे गुजरातला फिरायला जायचे, त्यानंतर दिवाळीसाठी माहेरी जायचे नियोजन आहे. मात्र, सोमवारी सकाळी लवकर मतदान करून आम्ही जाणार आहोत, असे मोशीतील शारदा म्हसाये यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com