
Maharashtra Weather : राज्यातील उकाड्यात वाढला
पुणे - राज्यातील मॉन्सूनचा जोर ओसरल्याने बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. त्यातच राज्यातील सरासरी कमाल तापमानातही वाढ झाली असून, त्यामुळे उकाडाही वाढला आहे. काही ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जना व विजांसह वादळी पाऊस हजेरी लावत आहे.
सोमवारी (ता. १) विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिमेकडील टोक सर्वसामान्य स्थितीच्या काहीसे उत्तरेकडे असून, पूर्वेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याकडे सकरले आहे. छत्तीसगडपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे.
राज्यात पावसाने उघडीप दिली असून, दिवसभर असणाऱ्या उन्हाच्या चटक्यामुळे कमाल तापमानासह उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. नंदूरबार जिल्ह्यातील अक्रणी येथे सर्वाधिक ८२ मिलिमीटर, तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.